जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याने सर्वसामान्य त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:32 AM2021-04-15T04:32:41+5:302021-04-15T04:32:41+5:30
साखरखेर्डा : लाॅकडाऊनच्या काळात किराणा दुकानदारांची चांदी होत असून शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त भावाने मालाची विक्री केली ...
साखरखेर्डा : लाॅकडाऊनच्या काळात किराणा दुकानदारांची चांदी होत असून शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त भावाने मालाची विक्री केली जात आहे़ यावर अन्न व औषध प्रशासनाने ठोस पाऊल उचलून जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य शे. शफी तांबोळी यांनी केली आहे.
गेल्या वर्षभरापासून लाॅकडाऊनच्या जोखंडात किरकोळ विक्रेते , मजूर , कापड व्यावसायिक सापडलेले आहेत. त्यामुळे या व्यवसायिकांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. शासन केव्हाही लाॅकडाऊन जाहीर करते, तेव्हा किराणा दुकान वगळता इतरांच्या दुकानाचे शटर बंद करते . हे शटर बंद करताना साठवलेल्या मालाचे करायचे काय ! मोठ्या व्यापाऱ्यांची देणी चुकती कशी करायची , मजुरांना पगार कोठून द्यायचा , आणि हा सर्व प्रपंच झाल्यानंतर कुटुंबाचे आर्थिक नियोजन करायचे कसे? असे कितीतरी प्रश्न उपस्थित होत आहे . बॅंकांचे हप्ते थकल्याने कर्जाचा डोंगर उभा राहत आहे. ही परिस्थिती निर्माण झाली असताना आज पुन्हा लाॅकडाऊनचा सामना करावा लागत आहे . किराणा दुकानात किराणा घ्यायला गेलो तर तेलाचे भाव एका वर्षात ८० वरुन १५० वर गेले आहेत . शेंगदाणे व इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव दुपटीने वाढले आहेत यावर प्रशासनाने ठोस पाऊल उचलून जीवनावश्यक वस्तूंचा होणारा काळाबाजार थांबवावा आणि इतर व्यावसायिकांना पाडवा आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त थोडी सवलत द्यावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य शे. शफी शे. गुलाब तांबोळी यांनी केली आहे .