जनरल स्टोअर्स, शीतपेयाची दुकाने झाली दूध, भाजीपाला विक्री केंद्रे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:35 AM2021-04-27T04:35:23+5:302021-04-27T04:35:23+5:30
बुलडाणा : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता केवळ अत्यावश्यक सेवांना सकाळी सात ते ११ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. मात्र, ...
बुलडाणा : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता केवळ अत्यावश्यक सेवांना सकाळी सात ते ११ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. मात्र, यातही काही दुकानदारांनी निर्बंधाच्या काळातही आपले दुकान सुरू ठेवण्यासाठी दुकानाच्या पाट्याच बदलविल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. कारवाईपासून वाचण्यासाठी दुकानदारांनी ही अनोखी शक्कल लढविली आहे. त्यामुळे जनरल स्टोअर्स, शीतपेयाची दुकाने आता दूध आणि भाजीपाला विक्री केंद्रे बनली आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. त्यामुळे १५ एप्रिलपासून जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांनाही सकाळी सात ते ११ वाजेपर्यंतच मुभा देण्यात आलेली आहे. यामध्ये दूध विक्रेत्यांनी वेळ वाढवून देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे लाऊन धरली होती. त्यामुळे दूध हे नाशवंत असल्याने त्यांच्या मागणीचा विचार करून होणारे नुकसान टाळण्यासाठी दूध विक्रेत्यांना सकाळ व सायंकाळी दोन तासांची मुभा देण्यात आलेली आहे. दूध डेअरी व दूध विक्रेत्यांना दिलेल्या या मुदतीचा गैरफायदा इतर दुकानदारही घेत आहेत. निर्बंधाच्या काळात आपले दुकान सुरू ठेवण्यासाठी अनेकांनी आपल्या दुकानांच्या पाट्याच बदलविल्याचे चित्र दिसून येते. जीवनावश्यक वस्तूंची नावे टाकून इतर दुकाने सुरू ठेवण्यात येत आहेत. शीतपेयांच्या दुकानांसमोर दूध डेअरीच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. काही जनरल स्टोअर्स चालकांनी डेली निड्स, किराणा व भाजीपाला असे याठिकाणी मिळत असल्याचे बोर्ड आपल्या दुकानांसमोर लावले आहेत. पालिका व पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईपासून वाचण्याची वेगळी शक्कल दुकानदारांनी शोधून काढल्याचे चित्र दिसून येते.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर दररोज कारवाई सुरूच आहे. इतर दुकानदारांनी जर दुकानासमोर दूध डेअरीचे बोर्ड लावलेले असेल, तर त्यांच्याकडे दूध डेअरीचे शॉप ॲक्ट असणे गरजेचे आहे. शॉप ॲक्टवर नमूद बाबी नसतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
गजानन लहासे, उपमुख्याधिकारी, नगर पालिका बुलडाणा.
बाहेरून बंद, आतून सुरूच
सध्या लग्नाचा हंगाम सुरू असल्याने कापड खरेदीसाठी काही दुकानदार नियमांचे उल्लंघन करून दुकाने सुरू ठेवत आहेत. अनेक दुकाने बाहेरून बंद दिसत असले, तरी आतून सुरूच असल्याचे वास्तव आहे.
दंड पोहोचला एक लाखांवर
सध्या संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई नगर पालिकांकडून सुरू आहे. बुलडाण्यातील हा दंड एक लाखांवर पोहोचला आहे. २६ एप्रिल रोजी मेहकर शहरातील एक कापड दुकान सुरू असल्याने दुकान मालकावर दहा हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामुळे इतर दुकानमालकांचे धाबे दणाणले आहेत.
महिन्याभरात बुलडाण्यातील दंडात्मक कारवाईचे चित्र
९०८००
संचारबंदीचे उल्लंघन
४६८००
मास्क न लावणे