मोफत स्वस्त धान्य मिळणार; एक अफवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 11:56 AM2020-04-01T11:56:47+5:302020-04-01T11:57:00+5:30
असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्टीकरण अन्न व नागरी पुरवठा विभागाने केले आहे.
- ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शिधापत्रिका नसलेल्या कुटूंबाना रेशन दुकानावरून धान्य मिळण्यासाठी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांना एक फॉर्म भरून द्यावा, असे आवाहन करणारा एक संदेश आणि फॉर्मचा नमुना समाज माध्यमावर फिरत होता. परंतू मोफत स्वस्त धान्य मिळणार असल्याची अफवास असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली आहे. बनावट फॉर्म व्हायरल झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता. असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्टीकरण अन्न व नागरी पुरवठा विभागाने केले आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरील बेघन इत्यादी जेवनाअभावी हाल होऊ नये, लोकांना रेशन पासून वंचित राहावे लागू नये, यासाठी काही लोकांनी शिधापत्रिका नसलेल्या कुटूंबाना रेशन दुकानावरून मोफत धान्य मिळणार असल्याचा संदेश सोशल मिडीयावरून व्हायरल केला आहे.
धान्य मिळण्यासाठी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांना एक फॉर्म भरून द्यावा, असे आवाहन करणारा एक फॉर्मचा नमुना समाज माध्यमावर काही दिवसांपासून फिरताना दिसून येत आहे. हा फॉर्म भरून दिल्यास ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, त्यांनाही रेशन दुकानावर धान्य मिळेल, असा दावा केला गेला. परंतू असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, किंवा असा कोणताही फॉर्म काढलेला नसल्याचे स्पष्टीकरण अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव संजय खांदारे यांनी केले आहे. रेशनवरील धान्य मिळण्यासाठी रेशन कार्ड असणे ही प्राथमिक अट आहे. हे कार्ड नसेल तर धान्य मिळणार नाही, अशी माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
मोफत धान्य वाटप होणार असल्याची अफवा आहे. असा कुठलाच निर्णय विभागाने घेतला नाही. मोफत धान्य देण्यात संदर्भात काढण्यात आलेला फॉर्म बनावट आहे.
-गणेश बेल्लाळे,
जिल्हा पुरवठा अधिकारी, बुलडाणा.