लोणार इको सेंसेटिव्ह झोनमधील रस्त्यांचा प्रश्न त्वरीत मार्गी लावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 11:04 IST2020-07-24T11:04:02+5:302020-07-24T11:04:19+5:30
जिल्हाधिकारी यांनी पाठपुरवा करावा असे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले आहेत.

लोणार इको सेंसेटिव्ह झोनमधील रस्त्यांचा प्रश्न त्वरीत मार्गी लावा!
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जैवविविधतेसह लोणार सरोवराच्या काठावरील इजेक्टा ब्लँकेटचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने लोणार-किन्ही रोड आणि लोणार मंठा रस्त्याला पर्यायी रस्ता उपलब्ध करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी पाठपुरवा करावा असे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले आहेत. दरम्यान, लोणार पालिकेकडे असलेली निधीची कमतरता पाहता सरोवर काठावर शौचास जाणाऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांनी पालिकेला संपूर्ण सहकार्य करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
लोणार सरोवर संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या अनुषंगाने २२ जुलै रोजी नागपूर खंडपीठात सुनावणी झाली. त्यावेळी लोणार सरोवराच्या काठावरून जाणाºया लोणार-किन्ही आणि लोणार मंठा रस्ता हा सरोवराच्या इको सेंसेटीव्ह झोनमध्ये येत आहे. त्यामुळे या रस्त्यांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून तसा प्रस्ताव पाठविण्याबाबत यापूर्वीच्या सुनावणी दरम्यान खंडपीठाने स्पष्ट केले होते. हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असता यात जिल्हाधिकारी यांनी स्वत: पाठपुरावा करून सार्वजनिक बांधकाम विभागाचा या संदर्भातील कामांचा आढावा घेवून पाठपुरावा करण्यात यावा, असे स्पष्ट केले असल्याचे सुत्रांनी सांगितले.
लोणार सरोवराच्या काठावरून जाणारे हे रस्ते हे इजेक्टा ब्लँकेटच्या ठिकाणी असल्याचा अंदाज आहे. या भागात आढळणारे दगड, खडक हे अमुल्य आहे. त्यामुळे या रस्त्यांसाठी पर्याय शोधण्यात यावा, असे जून महिन्याच्या मध्यावर घेण्यात आलेल्या सुनावणी दरम्यान स्पष्ट करण्यात आले होते. त्या प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेवून हा मुद्दा मार्गी लावावा, असे म्हंटले आहे. किन्ही रोड परिसरातील अमुल्य खडकाच्या जतनासोबतच इजेक्टा ब्लँकेटच्या जतनालाही महत्तव देणे गरजेचे आहे. दुसरीकडे लोणार सरोवरात जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी उभारण्यात आलेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवितांना लोणार पालिकेला निधीसह अन्य काही बाबींची अडचण जात आहे. त्याबाबत खंडपीठात पालिकेच्या वतीने अनुषंगीक माहिती देण्यात आली. त्यानुषंगाने पोलिस प्रशासनाने सरोवर काठाच्या परिसरात शौच्छास कोणी जाणार नाही किंवा त्यास प्रतिबंध घालण्यासाठी सहकार्य करण्याचे आदेशच नागपूर खंडपीठाने दिले आहेत.
वन्यजीव विभागास मिळाला एसीएफ
लोणार सरोवर संरक्षण व संवर्धनासाठी वन्यजीव विभागात अधिकाºयांची कमतरता असून त्यादृष्टीने वन्यजीव विभागासाठी सहाय्यक वन्यजीव संरक्षक आणि वन परिक्षेत्र अधिकाºयांची गरज असल्याचे सहा जुलै रोजीच्या खंडपीठाच्या सुनावणी दरम्यान समोर आले होते. त्यासंदर्भाने २२ जुलै पुर्वी प्रधान सचिव (वने) यांनी संबंधीत अधिकाºयांची नियुक्ती करावी, असे आदेश दिले होते. त्याचीही पुर्तता झाल्याचे २२ जुलै रोजीच्या सुनावणी दरम्यान स्पष्ट झाले. या ठिकाणी आता दोन अधिकारी लवकरच पदभार स्वीकारणार असल्याचे सुत्रांनी सांगितले असून सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव) म्हणून साबळे आणि वनपरीक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) सानप हे लवकरच पदभार स्वीकारणार असल्याचेही सुत्रांनी सांगितले.