प्रत्येक पंचायत समितीच्या आवारात बांधणार ‘घरकुल’ प्रतिकृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 11:51 AM2021-02-03T11:51:35+5:302021-02-03T11:52:00+5:30
Panchayat Samiti News घरकुल कसे बनवावे, कसे असावे, याबाबत हा घरकुलाचा डेमो पंचायत समितीच्या आवारात बांधण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी प्रत्येक पंचायत समितीच्या आवारात घरकुलाची प्रतिकृती (डेमो हाऊस) बांधण्यात येणार आहे. घरकुल कसे बनवावे, कसे असावे, याबाबत हा घरकुलाचा डेमो पंचायत समितीच्या आवारात बांधण्यात येणार आहे.
तालुक्यातील सर्व नागरिकांना पाहण्यासाठी हे घरकुल खुले ठेवण्यात येणार आहे. सर्वांसाठी घरे २०२२ या शासनाच्या धोरणांतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे व त्यामध्ये गुणवत्ता निर्माण करणे यासाठी राज्यामध्ये २० नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या शंभर दिवसांच्या कालावधीत ‘महाआवास अभियान’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत घरे बांधत असताना त्या ठिकाणची स्थानिक भौगोलिक परिस्थिती, पारंपरिक बांधकाम पद्धती, स्थानिक स्तरावर उपलब्ध होणारी साधनसामग्री, आदींचा विचार करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात बांधण्यात येणारे घरकुल लाभार्थ्यांना राहण्यासाठी चांगले असावे. बांधकामाला मार्गदर्शक ठरावे, या धर्तीवर त्या ठिकाणची घरकुले बांधली जावीत, या उद्देशाने स्थानिक परिस्थितीचा सारासार विचार करून प्रत्येक तालुक्यात एक डेमो हाऊस बांधण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यासाठी सर्व राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना आहेत. स्थानिक जिओ मॅटिक कंडिशनचा विचार करून घरकुले बांधण्याबाबत मार्गदर्शक सूचनांच्या आधारे प्रत्येक तालुक्यात एक डेमो हाऊस बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना आहेत. घरे बांधत असताना हाऊस डिझाइन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे व इतर बाबींचा त्यामध्ये समावेश आहे.