‘गझले’तून समाजाच्या वेदना बाहेर पडतात - सुरेशकुमार वैराळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:32 PM2019-07-27T12:32:53+5:302019-07-27T12:33:54+5:30
सुरेश भट गझलमंचचे संस्थापक शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांच्याशी साधलेला संवाद...
अनिल गवई।
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: महाराष्ट्रातील ३६ पैकी २४ जिल्ह्यात ‘गझलरंग’ मुशायऱ्याचे आतापर्यंत ११२ कार्यक्रम सादर केले आहेत. नवोदीत तरूण गझलकार हे माध्यम सशक्त आणि अंत्यत प्रभावीपणे हाताळत आहेत. गझलेचा आस्वाद घेणारा चोखंदळ रसिकवर्गही मोठ्या संख्येत निर्माण झाला आहे. सुरेश भट गझलमंचचे संस्थापक शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांच्याशी साधलेला संवाद...
गझल आणि कवितेत काय फरक जाणवतो?
गझल आणि कविता या दोन्ही अजिबात वेगवेगळ्या नाहीत. तर गझल ही कवितेचाच एक भाग आहे. ज्यांचे गझलेचे ‘शेर’ जुळून येतात, त्यांनी स्वत:ला ‘श्रेष्ठ’ समजू नये आणि ज्यांचे जुळून येत नाहीत त्यांनी स्वत:ला अजिबात कमी समजता कामा नये. कविता आणि गझल लिहीण्यासाठी आशयासोबतच तळमळ महत्वाची आहे.
सोशल मिडीयामुळे गझलेचा प्रचार-प्रसार मिळण्यास मदत होतेय का?
निश्चितच. ताबडतोब व्यक्त होण्यासाठी सोशल मिडीया हे एक प्रभावी माध्यम आहे. ‘गझलरंग’ मुशायऱ्यात सहभागी अनेक युवा कलावंतांचा शोध यु-ट्यूब आणि फेसबूक सारख्या सोशल माध्यमांमुळेच लागला आहे. सोशल माध्यमांमुळे गझलकार आणि कलावंतांला ताबडतोब प्रतिक्रीया मिळण्यास नक्कीच मदत होते.
नवोदीत गझलकारांना आपण काय संदेश द्याल?
सातत्याने व्यक्त होण्यासाठी प्रत्येकाने सतत प्रयत्न करावेत. मात्र, कधीही प्रसिध्दीचा हव्यास धरू नये. प्रसिध्दीची हाव ही कोणत्याही व्यक्तीला खड्ड्यात घालते. थोडक्यात अभिव्यक्त होताना प्रत्येकाने आपले पाय जमिनीवरच ठेवावे. हा नियम नवोदित गझलकारांसाठीच नव्हेतर प्रत्येकच क्षेत्रात ‘प्रसिध्दी’चा हव्यास हा वाईट असतो, हाच आपला प्रामाणिक संदेश आहे. गझलसम्राट सुरेश भट यांनी ‘गझल’ हा अलौकिक काव्यप्रकार सर्वप्रथम मराठीत आणला आहे. मराठी मातीत हा प्रकार रूजविण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी गझल रसिकांपर्यंत पोहोचविली. त्यांची मेहनत सार्थकी लावण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झटण्याचा संकल्प आहे.
‘गझलरंग’मध्ये युवा कलावंतांच्या प्रतिसादाबाबत काय सांगाल?
मराठी गझल लिहिणाºया नवोदीत गझलकारांची गझल रसिकांशी भेट घालून देण्याच्या प्रमुख उद्देशाने ‘सुरेश भट गझलमंच’ची २९ एप्रिल २०१२ रोजी स्थापना झाली. स्थापनेपासून आतापर्यंत तब्बल १६६ कलावंतांचा ‘गझलरंग’ मुशायऱ्यात सहभाग आहे. एकाहून एक सरस रचना युवा कलावंत सादर करीत आहेत. युवा कलावंतांच्या व रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच मराठी गझल मुशायऱ्यांचे राज्यभर सातत्यपूर्ण सादरीकरण करण्यात येत आहे. यामध्ये महिला गझलकारांचाही उत्स्फूर्त सहभाग आहे.