वर्षभरात एक काेटींचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:33 AM2021-03-20T04:33:51+5:302021-03-20T04:33:51+5:30
बुलडाणा : राज्य शासनाने गुटखा विक्री व साठवणुकीवर बंदी घातली आहे. तरीही गुटख्याची विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या अन्न व औषध ...
बुलडाणा : राज्य शासनाने गुटखा विक्री व साठवणुकीवर बंदी घातली आहे. तरीही गुटख्याची विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने आवळण्यात येतात. गत वर्षभरात जिल्ह्यात विविध ठिकाणी धाडी टाकून अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने जवळपास १ काेटींचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेला गुटखा त्या त्या पाेलीस ठाण्यात ठेवण्यात आला आहे.
गुटख्याची विक्री व साठवणुकीवर राज्य शासनाने बंदी घातली आहे. तरीही काही ठिकाणी गुटख्याची विक्री हाेत असल्याने अन्न व औषध प्रशासन विभाग तथा पाेलीस विभागाच्यावतीने कारवाई करण्यात येते. अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने जप्त केलेला गुटखा आधी गाेदामात ठेवण्यात येत असे. मात्र, फेब्रुवारी २०२० पासून जप्त केलेला गुटखा हा ज्या पाेलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई झाली असेल तिथे ठेवण्यात येताे. वर्षभरात ४६ कारवाया करीत अन्न व औषध प्रशासन विभागाने माेठ्या प्रमाणात गुटखा जप्त केला आहे.
अनेक पदे रिक्त असल्यानंतरही माेठ्या प्रमाणात कारवाया करण्यात आल्या आहेत.
अन्न व औषध प्रशासनाने २०२० मध्ये केलेल्या कारवाया
एप्रिल ११
मे १५
जून ०९
जुलै ०४
ऑगस्ट ०१
सप्टेंबर ००
ऑक्टाेबर ०१
नाेव्हेंबर ००
डिसेंबर ००
साठा ठेवण्यासाठी जागा नाही
अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने जप्त केलेला गुटखा ठेवण्यासाठी जागा नाही. फेब्रुवारी २० पूर्वी गाेदामात जप्त केलेला गुटखा ठेवण्यात येत हाेता. त्यानंतर मात्र, आता ज्या पाेलीस स्टेशनच्या हद्दीत कारवाई झाली असेल त्या पाेलीस ठाण्याच्या ताब्यात हा माल देण्यात येताे. त्यामुळे, अन्न व औषध विभागाचा भार काही प्रमाणात हलका झाला आहे.
वर्षभरात जप्त केलेला गुटखा
अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने एप्रिल ते डिसेंबर २०२० दरम्यान ४१ कारवाया करण्यात आल्या.
एप्रिलमध्ये विभागाने ११ कारवाया करून १८ लाख ८० हजार ७१५ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. तसेच मे महिन्यात १५ कारवाया करून ७ लाख ३२ हजार ४२० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
जुन महिन्यात ९ कारवाया करून १ लाख ५४ हजार २९० रुपयांचा गुटखा अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केला आहे. जुलै महिन्यात ४ कारवायांमध्ये १ ला ६५ हजार ३३० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. जानेवारी २०२१ मध्ये एका कारवाईत ३५ लाख ६४ हजार ५० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. तसेच मार्च महिन्यात आतापर्यंत चार कारवायांमध्ये १ लाख ०१ हजार ७६२ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर
जिल्ह्यातील कुठल्याही काना-कोपऱ्यातून माहिती मिळताच अन्न औषध व प्रशासन विभाग कारवाईसाठी पावले उचलतो. यामुळे वर्षभरात ४६ प्रकरणांमध्ये मोठी कारवाई करण्यात आली. यात एक कोटी ०१ लाख रुपयांचा
गुटखा जप्त करण्यात आला. याशिवाय अन्नपदार्थ नमुने आणि दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
- एस. डी. केदारे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, बुलडाणा