गारपीटग्रस्त भागाचा पंचनामा करून मदत द्या - मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:36 AM2018-02-13T00:36:14+5:302018-02-13T00:36:51+5:30
चिखली: वादळी वार्यासह गारपिटीने जिल्हय़ातील नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या पिकांचा तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह तालुका काँग्रेस, भारिप बमसं आदींनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली: वादळी वार्यासह गारपिटीने जिल्हय़ातील नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या पिकांचा तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह तालुका काँग्रेस, भारिप बमसं आदींनी केली आहे.
११ फेब्रुवारी झालेल्या गारपिटीने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असल्याने या बिकट स्थितून तो सावरावा यासाठी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावे व शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. यावेळी स्वभिमानीचे नितीन राजपूत, जिल्हा उपाध्यक्ष अनिल वाकोडे, तालुकाध्यक्ष शेख मुख्तार, अमोल तेलंग्रे, स्वानंद जैवाळ, राम अंभोरे, शरद राऊत, विनोद धनवे, राजू पाटील, अमोल जाधव, रामेश्वर परिहार, गजानन गायकवाड व शेतकरी उपस्थित होते.
मोका पाहणी करून नुकसान भरपाई मिळावी : युवक काँग्रेस
चिखली तालुक्यात झालेल्या तुफान गारपिटीमुळे शेतकर्यांच्या रब्बी हंगामातील पिके, फळबागा व भाजीपाला वर्गीय पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हय़ात सर्वाधिक चिखली तालुक्यात शेतीचे नुकसान झाले असल्याने या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकर्यांना एकरी २५ हजार नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी युवक काँग्रेसने एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली असून, विलंब झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन देताना रमेश सुरडकर यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भारिप बहुजन महासंघाचे निवेदन
तालुक्यात ११ फेब्रुवारीला झालेल्या गारपिटीने १४ हजार १२४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, या नैसर्गिक आपत्तीने संकटात सापडलेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने नुकसानीचा पंचनामा करून एकरी ३0 हजार रुपये मदत देण्यात यावी, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाच्यावतीने एका निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. या निवेदनावर तालुका उपाध्यक्ष संजय जाधव १६ जणांच्या स्वाक्षर्या आहेत.
लोणार तालुक्यातील १९ गावांत नुकसान
गारपिटीच्या तडाख्याने ११ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील १९ गावात नुकसान झाले आहे. आ.डॉ. संजय रायमुलकर यांच्या निर्देशानुसार नायब तहसीलदार आर.डी. डाके यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी, तलाठी, तालुका कृषी कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलेल्या पाहणीच्या प्राथमिक अहवालानुसार तालुक्यातील १0७९.५0 हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे.
वादळी वार्यासह ११ फेब्रुवारी रोजी सकाळी गारपीट झाल्याने गहू, हरभरा, नेडशेडमधील पिकांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार तालुक्यातील १0७९.५0 हेक्टर शेती पिकांचे नुकसान झालेले आहे. ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय असलेल्या पंचायत समितीच्या सभापती निर्मला जाधव यांनी ग्रामीण भागाची पाहणी केली.
तालुक्यातील आरडव येथे ८0 हेक्टर, जांबूल १0४ हेक्टर, गुंजखेड १२0 हेक्टर, बागुलखेड ५0 हेक्टर, पहूर ८0 हेक्टर, जाफ्राबाद २२ हेक्टर, वढव येथे ११ हेक्टर, दाभा ५२ हेक्टर, पिंपळनेर ३0.५0 हेक्टर, अजीसपूर ७ हेक्टर, खुरमपूर ७५ हेक्टर, देऊळगाव वायसा ७८ हेक्टर, शिवनी जाट २७ हेक्टर, नांद्रा ५९ हेक्टर, भिवापूर ३0 हेक्टर, गोत्रा ७५ हेक्टर, टिटवी ११0 हेक्टर, धाड ३५ हेक्टर, पाथरा येथे ३४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, तालुकाध्यक्ष सदानंद तेजनकर यांनी केली आहे.
देऊळगावराजा तालुक्यात फळबागांचे नुकसान
रविवारी सकाळी अवकाळी पावसासह गारपिटीने अनेक गावांना फटका बसला. मोठय़ा प्रमाणात अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने शेतकर्यांच्या रब्बी पिकांचे व फळबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.
देऊळगाव राजा तालुक्यातील भिवगाव, भुंबरा, सावखेड भोई, पिंपळगाव चिलमखा या गावात गारपिटीने गहू, हरभरा, कांदा या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. तसेच या भागात जास्त गारपीट झाल्याने या भागातील द्राक्षबाग, संत्राबाग, डाळिंब बागाचे व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. गारपिटीमुळे नुकसान झालेल्या गावात स्वत: देऊळगावराजाचे तहसीलदार दीपक बाजड यांनी नुकसानग्रस्त पिकांची फळबागांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत सिंदखेडराजाचे आ. डॉ. शशिकांत खेडेकर, मनोज कायंदे यांनी पाहणी केली. यावेळी तहसीलदार बाजड यांनी गारपीट झालेल्या भागाचा तत्काळ सर्व्हे करण्याचे निर्देश दिले असून, त्यानुसार सर्व्हेला सुरुवात करण्यात आली आहे.
तरी प्रशासनाने गारपीटग्रस्त भागाची पाहणी करून तत्काळ नुकसानग्रस्त भागाचा सर्व्हे करून शेतकर्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी देऊळगावराजा तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रा. दिलीप सानप यांनी केली आहे.