भविष्याच्या पिढीला केंद्रबिंदू मानून शाश्वत विकासाला महत्त्व द्या- एस. रामामूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:36 AM2021-07-30T04:36:16+5:302021-07-30T04:36:16+5:30
धामणगाव बढे: सध्याच्या पिढी सोबतच भविष्यातील पिढीसाठी सुरक्षित, समृद्ध व आशादायक जग निर्मिती हे उद्दिष्ट मानून काम करण्याची गरज ...
धामणगाव बढे: सध्याच्या पिढी सोबतच भविष्यातील पिढीसाठी सुरक्षित, समृद्ध व आशादायक जग निर्मिती हे उद्दिष्ट मानून काम करण्याची गरज असून त्यासाठी भविष्यातील पिढीला केंद्रबिंदू म्हणून शाश्वत विकासाची संकल्पना राबविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी २९ जुलै रोजी केले.
पाणी फाउंडेशनकडून २०२० पासून सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेला महाराष्ट्रातील एकूण ३९ तालुक्यांमध्ये सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये सहभागी गावाकरिता फेब्रुवारीमध्ये मिनी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पात्र असणाऱ्या मोताळा तालुक्यातील गावांचा सन्मान सोहळा जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या उपस्थित राज्यस्तरीय वॉटर कप द्वितीय पुरस्कार विजेते गाव सिंदखेड येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी माचेवाड, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, भारत कासार, निरंजन वाढे, सिंदखेडच्या सरपंच सीमा प्रवीण कदम, उपसरपंच शारदा उजाडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
दरम्यान, जल व मृदसंधारण हाच आपल्या शाश्वत विकासाचा गाभा असून त्यावर काम केल्याशिवाय गावाची वाटचाल समृद्धीकडे होणे अशक्य आहे. तसेच शेतीचे उत्पन्न, उत्पादकता, सेंद्रिय शेतीतील उद्दिष्ट गाठण्यासाठी जल व मृदसंधारणावर भर देणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. पाणी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेमध्ये नेमके यावर काम केले जात आहे. समृद्ध गाव स्पर्धेच्या निमित्ताने मोताळा तालुक्यामध्ये जल व मृद संधारणाच्या बाबतीत शाश्वत विकासाच्या दृष्टीने लोकचळवळ निर्माण झाली आहे असे ते म्हणाले. यावेळी राजेंद्र वैराळकर यांनी सिंदखेडने राबवलेल्या योजनांची यशोगाथा यावेळी मांडली. प्रास्ताविक सुखदेव भोसले यांनी तर सूत्रसंचालन ब्रह्मदेव गिऱ्हे यांनी केले. आभार दिलीप मोरे यांनी मानले.
--लखपती कुटुंब, समृद्ध कुटुंब--
यावेळी रोहयोचे उपजिल्हाधिकारी माचेवाड यांनी ‘लखपती कुटुंब, समृद्ध कुटुंब’ ही संकल्पना मांडली. सोबतच नरेगाची काम करण्याची पद्धत आता बदलली असून मागेल ते काम देण्याची कार्यपद्धतीने रोहयोतंर्गत राबविण्यात येत असल्याचे ते म्हणाले. राजेश लोखंडे यांनी समृद्ध गाव स्पर्धेमध्ये काम करत असलेल्या सर्व गावांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच समृद्ध गाव स्पर्धेबरोबरच गावाने गावाची एकी आणि नेकी टिकवून त्याच्या जोरावर गावाचा विकास करावा असे स्पष्ट केले.
--१९ गावांचा सन्मान--
या कार्यक्रमात जयपूर, जनुना, महाळुंगी जहागीर, वारुळी, उऱ्हा, पोखरी, चिंचपूर, तिघ्रा, दाभा, उबाळखेड, शेलापूर खुर्द, चिंचखेड नाथ आणि सिंदखेड या गावांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सोबतच पोफळी, लपाली, खामखेड कोऱ्हाळा बाजार, अंत्री, रिधोरा जहागीर आणि भोरटेक गावांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल या गावांना सन्मानपत्र जिल्हाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले. दरम्यान, ‘वॉटर वुमन वारियर’ हा पुरस्कार मिळाल्याबद्दल उबाळ खेड येथील कामिनी राजगुरू यांचाही सत्कार करण्यात आला. जलशक्ती मंत्रालय आणि स्टॉकहोम इंटरनॅशनल वॉटर इन्स्टिट्यूच यांच्यावतीने राजगुरू यांना पुरस्कार मिळालेला आहे.