अंगणवाडी सेविका, मदतनीस व इतर कर्मचाऱ्यांना कोरोना आजारात पगारी सुटी द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:36 AM2021-04-04T04:36:02+5:302021-04-04T04:36:02+5:30
आमदार श्वेता महाले यांनी यासंदर्भाने ना. यशोमती ठाकूर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. यामध्ये जि.प. अंतर्गत महिला ...
आमदार श्वेता महाले यांनी यासंदर्भाने ना. यशोमती ठाकूर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. यामध्ये जि.प. अंतर्गत महिला व बाल कल्याण विभागातील एकात्मिक बाल विकास प्रकल्पामध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच इतर कार्यालयीन कर्मचारी कोरोना काळात सर्व कार्यालयीन कामे व वेळोवेळी नेमून दिलेली कामे पार पाडत आहेत. अंगणवाडी सेविका, मदतनीस आहार वाटप, बालकांचे वजन-उंची घेणे, गृहभेटी तसेच पर्यवेक्षिकादेखील गरोदर व स्तनदा माता भेटी, कुपोषित, दिव्यांग बालकांना भेटी, अंगणवाडी भेटी तसेच कार्यालयीन कामे पार पाडत आहेत. ही कामे पार पाडत असताना कोरोना संसर्ग झाल्यास अथवा सहकारी पॉझिटिव्ह आल्यास इतरांना अलगीकरणात रहावे लागते, तेव्हा आणि पॉझिटिव्ह रुग्णांना दवाखान्यामध्ये भरती व्हावे, लागते तेव्हा त्यांच्या मानधनात कपात होत आहे. वास्तविक हे सर्वजण जीव धोक्यात घालून काम करत असताना त्यांना पगारी सुटीची कोणतीही तरतूद महिला बाल कल्याण विभागाने आजपर्यंत केलेली नाही. अशा परिस्थितीत सुटी घेतल्यास कर्मचाऱ्यांचा पगार कपात करणे, ही बाब अन्यायकारक असल्याने शिक्षण विभाग, आरोग्य विभाग व इतर विभागांनी ज्याप्रमाणे कोविडची विशेष रजा अनुज्ञेय केली आहे, त्याप्रमाणे महिला बाल कल्याण विभागाने बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच कार्यालयीन कर्मचारी यांना कोरोनाच्या संसर्गामुळे सुटी लागत असल्यास विशेष पगारी रजा द्यावी, अशी मागणी आ. महाले यांनी ना. ठाकूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.