निवासी जागा द्या, आदिवासी महिलांची धडक; ग्रामपंचायत पदाधिकारी जागेतून हुसकावत असल्याचा आरोप
By सदानंद सिरसाट | Published: August 24, 2023 02:11 PM2023-08-24T14:11:56+5:302023-08-24T14:12:13+5:30
खामगाव : तालुक्यातील जयरामगड या आदिवासीबहुल गावातील रहिवासी महिलांनी गुरुवारी दुपारी थेट पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कक्षात धडक दिली. ...
खामगाव : तालुक्यातील जयरामगड या आदिवासीबहुल गावातील रहिवासी महिलांनी गुरुवारी दुपारी थेट पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कक्षात धडक दिली. यावेळी गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी रहिवासाच्या जागेतून हुसकावत असल्याचा आरोप महिलांनी केला. निवासासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
दुर्गम भागात असलेल्या जयरामगड गावात आदिवासींची संख्या मोठी आहे. गावात काही प्रमाणात आदिवासींनी शासकीय जागा तसेच खुल्या जागांवर निवासासाठी निवारे बांधले आहेत. मात्र, ग्रामपंचायत पदाधिकारी संबंधितांना त्या जागेतून हुसकावत असल्याने त्यांच्या निवासाची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या तातडीने सोडवून रहिवासासाठी जागा द्यावी, अशी मागणी महिलांनी गटविकास अधिकारी चंदनसिंग राजपूत यांच्याकडे केली. त्यासाठी त्यांनी राजपूत यांच्या कक्षात बराच वेळ ठाण मांडले. यावेळी तलाठी आणि ग्रामसेवकाला तातडीने बोलवा, जागेची समस्या मार्गी लावा, अशी भूमिका महिलांनी घेतली. त्यांच्यासोबत लहान मुलेही असल्याने त्याठिकाणी तलाठी आणि ग्रामसेवकाला बोलावून त्यांच्या मागण्या मार्गी लावण्याचा आदेश गटविकास अधिकारी राजपूत यांनी दिला.