रस्ते विकास आराखड्यासाठी ठराव द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:40 AM2021-03-01T04:40:32+5:302021-03-01T04:40:32+5:30
रस्त्यांच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध होऊन रस्त्यांच्या सुधारणा केल्या जातात. त्यासाठी हे रस्ते शासनाच्या रस्ते विकास ...
रस्त्यांच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध होऊन रस्त्यांच्या सुधारणा केल्या जातात. त्यासाठी हे रस्ते शासनाच्या रस्ते विकास आराखड्यात असणे आवश्यक आहे. जे रस्ते विकास आराखड्यात आहेत, त्याच रस्त्यांवर निधी खर्च करता येतो. या रस्त्यांना योजनेत समाविष्ट किंवा प्लॅन रस्ते असे म्हणतात. जे गाव जोड रस्ते विकास आराखड्यात घेतलेले नाही, म्हणजेच योजनेत किंवा प्लॅनमध्ये नाहीत, त्या रस्त्यांना नॉनप्लॅन किंवा योजनाबाह्य रस्ते असे म्हणतात. या नॉनप्लॅन किंवा योजनाबाह्य किंवा रस्ते विकास आराखड्यात नसलेल्या रस्त्यावर शासकीय निधी खर्च करता येत नाही. परिणामी ग्रामीण भागातील गावागावांना, वाड्यावस्त्यांना व तांड्यांना जोडणारे अतिशय जवळचे फार रस्ते ज्यात पाणंद किंवा शेत रस्ते म्हणून संबोधल्या जाते, अशा रस्त्यांचा अद्याप विकास होऊ शकलेला नाही. अशा नॉनप्लॅन शेत व पाणंद रस्त्यांचा समावेश रस्ते विकास आराखड्यात होऊन त्यांचा विकास साधण्यासाठी आ. श्वेता महाले यांनी ग्रामपंचायतींना याबाबत ठराव घेण्याचे आवाहन केले आहे. मतदारसंघातील चिखली आणि बुलडाणा तालुक्यातील २०२१ ते २०४१ या २० वर्षांसाठी रस्ते विकास आराखडा बनविण्याचे काम सुरू असल्याने शेतरस्ते व पाणंद रस्त्यांचे नाव व लांबीच्या माहितीसह ग्रामपंचायत ठराव घ्यावा, व तो सेवालय या संपर्क कार्यालयात द्यावा, असे आवाहन आ. श्वेता महाले यांनी मतदारसंघातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, व शेतकऱ्यांना केले आहे.