मतदान केंद्रावर उपस्थितीबाबत लेखी आदेश द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:27 AM2020-12-25T04:27:57+5:302020-12-25T04:27:57+5:30
माेताळा : आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केंद्रावर उपस्थित राहण्याविषयी लेखी आदेश देण्याची मागणी महाराष्ट राज्य गाव कामगार पाेलीसपाटील संघटनेने ...
माेताळा : आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केंद्रावर उपस्थित राहण्याविषयी लेखी आदेश देण्याची मागणी महाराष्ट राज्य गाव कामगार पाेलीसपाटील संघटनेने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पोलीसपाटील यांची नियुक्ती ग्राम पोलीस अधिनियम १२६७ अन्वये होत असून त्यांच्यावर गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची संपूर्ण जबाबदारी असते. निवडणूक कार्यकाळात आचारसंहिता जाहीर झाल्यापासून ते प्रत्यक्ष मतदानप्रकिया पारपाडेपर्यंत पोलीसपाटील संपूर्ण जबाबदारी अत्यंत निष्ठेने पार पाडीत असतात. तसेच पोलिंग पार्टीची जेवणासह संपूर्ण व्यवस्था पोलीसपाटील स्वखर्चाने करीत असतात. परंतु मलकापूर उपविभाग वगळता बुलडाणा जिल्ह्यातील इतर सर्व उपविभागांतील पोलीसपाटलांना निवडणुकी संदर्भात लेखी आदेश द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. महसूल व पोलीस विभागाकडून पोलीसपाटील यांना मतदान केंद्रावर हजर राहण्यासंबंधी तोंडी सूचना देण्यात येतात. ग्रामपंचायत निवडणूक ही स्थानिक निवडणूक असल्याने आकसापोटी पोलीसपाटलांच्या खोट्या तक्रारी होण्याची दाट शक्यता आहे. मतदान केंद्रावर उपस्थित रहावे किंवा नाही याबाबत पोलीसपाटलांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्या उपविभागातील पोलीसपाटलांना येत्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदान केंद्रावर उपस्थित राहण्याकरिता लेखी आदेश व भत्ता देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र भामदे, अनिल पालवे, अमाेल सुरडकर, श्रीकृष्ण तायडे, राेहित ठाकूर, गजानन तायडे आदींसह इतरांची स्वाक्षरी आहे.