यकृत देऊन भावाला जीवदान; मात्र बहिणीने साेडले प्राण; आधुनिक दुर्गाची भावनिक करणारी भाऊबीज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 09:12 AM2023-11-17T09:12:37+5:302023-11-17T09:12:48+5:30

अंढेरा येथील रमेश नागरे (वय ४८) हे मूळ शेतीसह हॉटेल व्यवसाय करतात. २०१९ पासून ते पोटाच्या विकाराने त्रस्त हाेते.

Giving life to a brother by giving a liver; But the sister lost her life, Incidents in Buldhana | यकृत देऊन भावाला जीवदान; मात्र बहिणीने साेडले प्राण; आधुनिक दुर्गाची भावनिक करणारी भाऊबीज

यकृत देऊन भावाला जीवदान; मात्र बहिणीने साेडले प्राण; आधुनिक दुर्गाची भावनिक करणारी भाऊबीज

सिंदखेडराजा (जि. बुलढाणा) : बहिणीने यकृत दान केल्यामुळे पाेटाच्या विकाराने त्रस्त असलेल्या भावाला जीवदान मिळाले. भाऊबिजेला भावाला बहिणीकडून मिळालेली अनमाेल भेट चर्चेचा विषय ठरली; मात्र यकृत प्रत्याराेपणानंतर १५ दिवसांपासून मुंबईत उपचार घेत असलेल्या बहिणीने गुरुवारी प्राण साेडले. हृदय हेलावून टाकणारी ही घटना आहे बुलढाणा जिल्ह्यातील.    

अंढेरा येथील रमेश नागरे (वय ४८) हे मूळ शेतीसह हॉटेल व्यवसाय करतात. २०१९ पासून ते पोटाच्या विकाराने त्रस्त हाेते. त्यांना स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तपासले. यकृतामध्ये अडचण असल्याचे निदान झाल्यानंतर यकृताचा काही भाग त्यांना मिळणे आणि त्याचे प्रत्याराेपण होणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार त्यांना आवश्यक असलेले यकृत घटक कोण देणार यात कुटुंब, नातेवाइकांत चर्चा झाली. अनेकांचा रक्तगट तपासला, त्यात बहीण दुर्गा धायतडक यांचा रक्तगट रमेश यांच्याशी मॅच झाला. दुर्गा या रमेश यांच्या धाकट्या बहीण आहेत. या आधुनिक दुर्गाने कोणताही विचार न करता आपल्या थोरल्या भावाला जीवदान देण्याचे ठरविले. 

बहिणीची अचानक एक्झिट! 

मुंबई येथील एका नामांकित खासगी रुग्णालयात हे यकृताचे प्रत्याराेपण झाले. बहिणीच्या त्यागामुळे भावाचे जीवन दिवाळीत प्रकाशमान झाले. रमेश यांना दोन महिने पुढील उपचार घ्यावे लागणार असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले तर अनेक तपासण्या बाकी असल्याने व वैद्यकीय काळजी म्हणून दुर्गा यांना डॉक्टरांनी मुंबईत राहण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार दुर्गा या मुंबईतच होत्या. गुरुवारी पहाटे त्यांना रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले; मात्र सकाळी त्यांची तब्येत खालावली. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र, हे सारे उपचार व्यर्थ ठरले. दुर्गा यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी व आप्त परिवार आहे.

Web Title: Giving life to a brother by giving a liver; But the sister lost her life, Incidents in Buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.