आरक्षणासाठी १० हजार रक्तांच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 04:05 PM2018-08-07T16:05:19+5:302018-08-07T16:08:29+5:30
आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर रक्त सांडण्यापेक्षा आरक्षणाच्या मागणीच्या भावना शासनापर्यंत पोहचविण्यासाठी रक्तांच्या सह्यांची मोहीम राबविण्यात आली.
बुलडाणा : मराठा आरक्षणाला आमचा पाठींबा असून मराठा समाजासह मुस्लीम, धनगर, लिंगायत व महादेव काळी या समाजाला त्वरित आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर रक्त सांडण्यापेक्षा आरक्षणाच्या मागणीच्या भावना शासनापर्यंत पोहचविण्यासाठी रक्तांच्या सह्यांची मोहीम राबविण्यात आली. या रक्तांच्या सह्यांचे निवेदन ७ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे.
या मोहीमेस सर्वधर्मातील व्यक्ती, राजकीय पक्षाच्या पधाधिकाºयांनी पाठींबा दिल्याची माहिती माजी राज्यमंत्री सुबोध सावजी स्थानिक विश्राम भवनात ७ आॅगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शाम उमाळकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रिजवान सौदागर, समिती संपर्क प्रमुख शैलेश सावजी आदींची उपस्थिती होती. सावजी पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात मराठा समाजासह मुस्लीम, धनगर, लिंगायत व महादेव काळी या समाजाला त्वरित आरक्षण मिळावे, अशी मागणी आहे. आरक्षण मिळण्यासाठी अनेक ठिकाणी मोर्चे, आंदोलने काढण्यात येत आहेत. काही ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडत आहेत. मात्र हिंसाचाराने काहीही साध्य होत नाही. त्यामुळे रस्त्यावर रक्त सांडते. मात्र आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर रक्त न सांडता आरक्षण मागणीच्या तिव्र भावना शासनापर्यंत पोहचविण्यासाठी १० हजार रक्ताने लिहिलेल्या सह्याची मोहीम १ ते ७ आॅगस्ट रोजी राबविण्यात आली. या रक्तांच्या सह्यांचे निवेदन ७ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे. यासाठी मराठा, मुस्लीम, धनगर, लिंगायत, महादेव कोळी यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले. त्यात काँग्रेसचे आमदार राहूल बोंद्रे, आमदार हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, शाम उमाळकर, माजी जि.प.अध्यक्ष प्रकाश पाटील, रिजवान सौदागर, बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष वा.रा.पिसे, शैलेश सावजी, अबरार मिल्ली, समितीचे सहसचिव सुनिता भांड, दामुअण्णा ढोणे, अविनाश अकोटकार, चंद्रकांत माने, जगन्नाथ भांड, संजय तारापुरे, खुशालराव गायकवाड आदींनी सहभाग घेत १० हजार रक्तांच्या सह्यांची मोहीम राबविली. या १० हजार रक्तांच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार असून या उपक्रमाची दखल राज्यस्तरावर घेण्यात येईल, अशी अपेक्षा यावेळी सुबोध सावजी यांनी व्यक्त केली.