शासकीय कर्मचाऱ्यांचा तयार होणार सर्वंकष माहितीकोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 07:52 PM2017-08-22T19:52:18+5:302017-08-22T20:02:11+5:30
बुलडाणा : नियोजन विभागाच्या परिपत्रकानुसार अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहिती कोष-2017 तयार केल्या जाणार आहे. हा कोष 16 ऑगस्ट 2017 ते 28 फेब्रुवारी 2018 या कालावधीत तयार होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : नियोजन विभागाच्या परिपत्रकानुसार अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहिती कोष-2017 तयार केल्या जाणार आहे. हा कोष 16 ऑगस्ट 2017 ते 28 फेब्रुवारी 2018 या कालावधीत तयार होणार आहे.
शासकीय कार्यालय यांनी कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांची कार्यालय व आहरण, संवितरण अधिकारीनिहाय सदर माहिती जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून पुरविण्यात येणाऱ्या संगणकीय आज्ञावलीमध्ये अद्ययावत करून 30 सप्टेंबर 2017 पर्यंत सादर करावयाची आहे. माहिती सादर केल्यानंतर जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून माहिती सादर केल्याबाबतचे पहिले प्रमाणपत्र 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2017 या कालावधीत प्राप्त करून घ्यावे. सदर प्रमाणपत्र माहे नोव्हेंबर 2017 च्या वेतन देयकासोबत सादर करणे अनिवार्य आहे. तसेच सादर केलेली माहिती बरोबर असल्याचे दुसरे प्रमाणपत्र 1 डिसेंबर 2017 ते 28 फेब्रुवारी 2018 या कालावधीत प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र फेब्रुवारी 2018 चे वेतन देयकासोबत सादर करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय सदर महिन्यांची वेतन देयके संबंधीत प्राधिकारी किंवा जिल्हा कोषागार कार्यालयाकडून स्वीकारली किंवा पारीत केले जाणार नाहीत. तरी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी याबाबत जिल्हा सांख्यिकी कार्यालयाशी संपर्क साधून कार्यालयबाबतचा युजर आयडी व पासवर्ड 31 ऑगस्ट 2017 पर्यंत प्राप्त करून घ्यावा. तसेच तात्काळ माहिती उपरोक्त आज्ञावलीमध्ये द्यावी, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी सं. मो राठोड यांनी केले आहे.