बुलडाणा जिल्ह्यात आता ‘गो-गर्ल-गो’ मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 04:03 PM2020-02-08T16:03:47+5:302020-02-08T16:03:55+5:30
‘गो-गर्ल-गो’ या मोहिमेंतर्गत राज्यात ६ ते १८ वयोगटातील १०० मीटर धावण्याच्या मुलींच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: केंद्र शासनामार्फत संपूर्ण देशामध्ये फीट इंडिया मुव्हमेंट हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने ‘गो-गर्ल-गो’ या मोहिमेंतर्गत राज्यात ६ ते १८ वयोगटातील १०० मीटर धावण्याच्या मुलींच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तालुकास्तर आणि जिल्हास्तरावर ही स्पर्धा झाल्यानंतर राज्यस्तरावर आयोजन करण्यात येणार आहे.
२९ आॅगस्ट २०१९ या राष्ट्रीय क्रीडा दिनी फीट इंडिया मुव्हमेंट या योजनेचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते इंदीरा गांधी स्टेडीयम, नवी दिल्ली येथुन करण्यात आलेला आहे. याप्रसंगी सर्वांनी शारीरिक तंदुरुस्तीबाबत शपथ दिली. या योजनेअंतर्गत राज्यातील मुलींचे तंदुरुस्तीबाबत जागरुकता निर्माण करण्याकरिता मुलगी शिकली की तिला योग्य दिशा मिळते. जेव्हा ती मोठी होते, तेव्हा ती संपूर्ण कुटूंबावर प्रभाव टाकते. त्याअनुषंगाने गो-गर्ल-गो या योजनेअंतर्गत राज्यात ६ ते १८ वयोगटातील १०० मीटर धावण्याच्या मुलींच्या स्पर्धा तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावर आयोजित करण्यात आलया आहेत. ही स्पर्धा सहा ते नऊ वर्षापर्यंत मुली, १० ते १३ वर्षापर्यंत मुली व १४ ते १८ वर्षापर्यंत मुली या तीन गटात आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये फक्त १०० मीटर धावण्याच्या स्पर्धांचे आयोजन शाळास्तर, तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरापर्यंत करण्यात येत आहे. राज्यस्तर स्पर्धा ८ मार्च २०२० रोजी जागतीक महिला दिनानिमित्त शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळूंगे-बालेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. राज्यस्तरावरील वैशिष्ट्यपुर्ण प्राविण्य प्राप्त करणाऱ्या मुलींना त्यांचे उज्वल क्रीडा भविष्यास अनुसरुन प्रायोजक तत्वाद्वारा प्रशिक्षणाकरीता संधी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. या स्पर्धेत शाळास्तरापासुन प्रत्येक वयोगटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या मुली पुढील स्तरावरच्या स्पर्धेसाठी पात्र ठरतील.
स्पर्धांसाठी १५ फेब्रुवारीची मुदत
बुलडाणा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा, उच्च प्राथमिक शाळा, विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांनी ६ ते १८ वयोगटानुसार शाळास्तरावर मुलींच्या १०० मीटर धावणे या स्पर्धेचे आयोजन १५ फेब्रुवारी २०२० पर्यंत करणे आवश्यक आहे. वयोगटनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाºया मुलींना तालुकास्तरावरील स्पर्धेकरीता प्राविण्य प्राप्त खेळाडूंच्या यादीसह सहभागी करुन घ्यावे, अशा सुचना क्रीडा विभागाने दिल्या आहेत. तालुकास्तरील स्पर्धा २४ फेब्रुवारी २०२० पर्यंत आयोजित होत असल्याने, तालुकास्तरीय स्पर्धेच्या तारखेकरीता आपले तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अथवा तालुका क्रीडा संयोजक यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी, बुलडाणा हे करीत आहेत.