देव तारी त्याला कोण मारी, अडीच तासांच्या प्रयत्नाने वाचला गुराख्याचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 10:39 PM2018-03-05T22:39:13+5:302018-03-05T22:39:13+5:30
दोन गुराख्यातील एक विहिरीत पडतो काय..? दुस-या मदतीसाठी महामार्गावर येतो काय, चालती गाडी थांबवून एक युवक पुढे जातो काय, त्याला जमत नाही म्हणून मित्रांना बोलावतो काय अन् सगळ्यांच्या प्रयत्नातून गुराख्याचा जीव वाचतो काय ?
- हनुमान जगताप
मलकापूर : दोन गुराख्यातील एक विहिरीत पडतो काय..? दुस-या मदतीसाठी महामार्गावर येतो काय, चालती गाडी थांबवून एक युवक पुढे जातो काय, त्याला जमत नाही म्हणून मित्रांना बोलावतो काय अन् सगळ्यांच्या प्रयत्नातून गुराख्याचा जीव वाचतो काय? हे एखाद्या चित्रपटाचे कथानक नसून खामगावनजीक पहुरजिरा शिवारात घडलेली घटना आहे. देव तारी त्याला कोण मारी ही म्हण अधोरेखित करणा-या रविवारी दुपारी घडलेल्या घटनेत मलकापूरच्या अकरा तरुणांच्या अडीच तासांच्या थरारक प्रयत्नांनी गुराख्याचा जीव वाचला. शेवटी संकटात सापडलेल्या हिंदू समाजाच्या गुराख्यास मुस्लीम तरुणांनी मरणाच्या दारातून परत आणल्याने माणुसकी जोपासताना जाती-पातीच्या राजकारणाला महत्त्व नसते हे पुरोगामी विचार अधोरेखित करणारी ही घटना होय.
पहुरजिरा येथील रहिवासी सहदेव कैलास पारसकर व वासुदेव सुरडकर खामगाव-जलंबदरम्यान रेल्वे मार्गानजीक शिवारात गुरे चरत होते. सहदेव पारसकर शेतातील विहिरीवर गेला. तर लाकडाची घिल्डी अचानक तुटल्याने तोल सुटून तो विहिरीत पडला. विहिरीत सुमारे १२ फूट पाणी असल्याने तो कसाबसा दगडाला पकडून राहिला. वासुदेव सुरळकर धावत आला त्याने सहका-याला बघितलं. तो मदतीसाठी सैरावैरा धावत महामार्गावर आला त्याने गाडी थांबविली.
त्या गाडीत अब्दुल मोईन हा युवक खाली उतरला व त्याने त्याची आतेबहीण व जावयास पुढे निघून जा, असे सांगत वासुदेव सोबत त्या विहिरीकडे धाव घेतली. येऊन बघतो काय सहदेवची मृत्यूशी झुंज सुरू होती. बांधकाम विरहीत ३० फूट विहिरीतून बाहेर काढायचे कसे? ह्या विचारात अब्दुल मोईनने आधी खामगाव येथे सायंकाळच्या विवाह समारंभासाठी येत असलेल्या सहका-यांना रेल्वेतून खाली उतरण्यास सांगितले व स्वत: उडी घेतली.
मलकापूरचे साजीद खान, जुबेर बाबरु, आरीफ कुरेशी, आलीम बागवान, राजा कुरेशी, मोहम्मद जुनेद आदींसह दहा जण घटनास्थळी दाखल झाले. अडीच तासांच्या थरारक प्रयत्नानंतर सहदेवला बाहेर काढल्यानंतरच अकरा तरूणांनी सुटकेचा श्वास सोडला. तोवर गावकरी दाखल झाले होते.