हौसेला मोल नाही...चिखलीतील व्यक्तीने बनवून घेतला सोन्याचा मास्क !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 10:51 AM2020-07-31T10:51:04+5:302020-07-31T10:55:58+5:30
चिखलीतील या ‘गोल्ड मॅन’ने कोरोनापासून बचाव करण्यासाठी चक्क साडेसहा तोळ्याचा हा सोन्याचा मास्क तयार करून घेतलेला आहे.
- सुधीर चेके पाटील।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : आजघडीला सोन्याच्या भावाने ५४ हजार ७०० रूपये प्रतितोळा प्रमाणे उच्चांकी भाव गाठला आहे. मात्र, अशा स्थितीतही येथील एका व्यक्तीने चक्क साडेसहा तोळ्यांचा सोन्याचा मास्क तयार करून घेतल्याने ‘हौसेला मोल नसते’चे प्रत्यंतर आले आहे. कोरोनाच्या महामारीच्या काळातही बनवलेल्या या सोन्याच्या मास्कमुळे शहरात चांगलीच खुमासदार चर्चा रंगत आहेत.
आपल्या देशात बहुसंख्य पुरूष लोकांना सोन्याचे दागिने घालण्याची हौस असते. या हौसेतून अनेकजण ‘गोल्ड मॅन’ म्हणून ओळखले जात असल्याने आवड, प्रसिद्धी आणि लौकिकासाठी अनेक जणांकडून सोन्याचे दागीने वापरण्यात येतात. दरम्यान, कोरानामुळे सध्या सर्वत्र ‘मास्क’ वापरणे बंधनकारक असल्याने या महामारीच्या काळातही कोल्हापूर, पुणे, बार्शी पाठोपाठ आता चिखली शहरातील दीपक वाघ या हौशी व सोन्याची आवड असलेल्या व्यक्तीने सोन्याचा मास्क तयार करून घेतला. सर्व जग कोरोनाच्या प्रादुर्भावाने त्रस्त असताना आणि लॉकडाऊनमुळे अर्थचक्र मंदावलेले व सोन्याचे भाव गगणाला भिडलेले असताना चिखलीतील या ‘गोल्ड मॅन’ने कोरोनापासून बचाव करण्यासाठी चक्क साडेसहा तोळ्याचा हा सोन्याचा मास्क तयार करून घेतलेला आहे. चिखली येथीलच काछवाल ज्वेलर्स या दुकानातून त्यांनी हा मास्क तयार करून घेतला.
या मास्कची अंदाजे किंमत ३ लाख ७० हजार रुपये आहे. दीपक वाघ यांना सोनं वापरण्याची आवड आहे. त्यांच्या गळा, हात नेहमीच सोन्याच्या आभुषणांनी मढलेला असतो. काही दिवसांपूर्वी सोन्याचा मास्कविषयी आलेल्या बातम्या पाहून आपणही सोन्याचा मास्क तयार करून घ्यावा, ही कल्पना आवडली आणि त्यांनी तसा मास्क तयार करून घेतला.
यापूर्वी राज्यातील विविध भागातून सोन्याचा मास्क तयार करून घेतल्याचे समोर आले आहे. त्याच पृष्ठभूमीवर चिखली येथील व्यक्तीने तयार करून घेतलेला सोन्याचा मास्क सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.