बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमच्या मनाला; खामगावात चोख पोलीस बंदोबस्त
By अनिल गवई | Published: September 28, 2023 10:41 AM2023-09-28T10:41:13+5:302023-09-28T10:41:29+5:30
लाकडी गणेशाचे आगमन झाल्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ
खामगाव : ''तू निघालास पुन्हा परतीच्या वाटेवर, तुझ्या निरोपाचा क्षण येताच, मन झाले भावविभोर...'' अशाच काहीशा भावना खामगावातील तमाम भाविकांसह गणेश मंडळाच्या पदाधिकार्यांच्या असल्याचे श्रींच्या विसर्जन मिरणवुकीत गुरूवारी पहाटेपासूनच दिसून येत आहे. घरगुती गणेशाचे पहाटेपासून तर सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीला मानाचा लाकडी गणपती सहभागी झाल्यानंतर सकाळी ९.२१ वाजता फरशी येथून सुरुवात झाली.
येथील श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत ३२ श्री गणेश मंडळे सहभागी झाली आहेत. विसर्जन मिरवणुकीत श्री गणेश मंडळांकडून विविध सामाजिक आणि प्रबोधनात्मक देखावे सादर करण्यात येत आहेत. मिरवणुकीत गांधीचौकातील वंदेमातरम मंडळाने यंदा प्रथमच हरियाणा हिस्सार येथून बाहुबली हनुमान व शिव तांडव नृत्य पथक निमंत्रित केले. हा देखावा आबाल वृध्दांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्याचे दिसून आले. या देखाव्यासह विविध आखाड्यांच्या मल्लांनी सादर केलेले चित्तथराक प्रात्यक्षिकांनी अनेकांचे लक्ष वेधले. श्रींच्या विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यस्था अबाधित ठेवण्यासाठी खामगाव शहरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
चौकट...
मान्यवरांकडून फरशी येथे पूजन
सकाळी ०९.५४वाजता खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी फरशी चौकात मानाच्या गणेशाचे पूजन केले. यावेळी आमदार ऍड आकाश फुंडकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, माजी नगराध्यक्ष गणेश माने, दर्शनसिंग ठाकूर, लाकडी गणेश विश्वस्त मंडळाचे सुरज अग्रवाल, मुख्य व्यवस्थापक आर.बी. अग्रवाल, डॉ. अनिल चव्हाण, या पोलिस अधीक्षक सुनील कडासने,अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अरुण परदेशी, पोलीस स्टेशनचे निरीक्षक शांतीकुमार पाटील यांच्यासह मान्यवरांच्य हस्ते मानाच्या गणेशाचे पूजन झाले.
. मिरवणुकीच्या प्रारंभी खामगावचा राजा मानाचा लाकडी गणेश त्यानंतर तानाजी मंडळ तर तिसऱ्यास्थानी हनुमान मंडळाचा गणपती आणि नंतर विविध गणेश मंडळ मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी विविध गणेश मंडळांच्या आखाड्यांनी मल्लखांब तसेच रोप मल्लखांबचे प्रात्यक्षिक सादर केले. तर वंदेमातरम मंडळाचा बाहुबली हनुमान मिरवणुकीत सहभागी होताच, मिरवणुकीचा नूरच पालटला.