सैलानी यात्रेत गोवंश हत्येला बंदी
By admin | Published: March 9, 2015 01:56 AM2015-03-09T01:56:30+5:302015-03-09T01:56:30+5:30
मागील वर्षी यात्रेत २१00 पशूंचा गेला बळी; कायद्याची अंमलबजावणी सुरू.
बुलडाणा : बोकड, कोंबडे, बैल आणि रेडे अशा हजारो पशूंचे बळी घेणार्या सैलानी यात्रेत यावर्षी पासून गोवंश हत्येला प्रतिबंध घालण्यात आल्याने येथे होणारी बैलाची कत्तल थांबली आहे. १ मार्च पासून सैलानी यात्रेला प्रारंभ झाला. १ ते ६ मार्चदरम्यान सैलानी यात्रेत ६0 बैलांची कत्तल करण्यात आल्याची अधिकृत माहिती आहे. ६ मार्चपासून मात्र बैल कापण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे.
सैलानी यात्रा ही हिंदू- मुस्लीम एकतेचे प्रतीक मानले जात असले तरी, येथे अंधश्रद्धेचा अक्षरश: बाजार मांडल्या जातो. येथे येणारा भाविक कोणत्या ना कोणत्या मानसिक आजाराने त्रस्त असतो. या मनोरुग्णावर कोणत्याही शास्त्रशुद्ध पद्धतीने उपचार केल्या जात नसून, मांत्रिकाच्या हस्ते गंडा-दोरी, अंगारे धुपारे करून आघोरी उपचार केल्या जातात. अंगावर चाबकाचे फटके मारणे, तापलेल्या सळईने डाग देणे, हातापायात बेड्या ठोकणे, महिलांचे केस धरून त्यांना फरपटत नेणे असे अमानवीय प्रकार येथे उघडपणे घडत असतात. आजच्या विज्ञान युगातही असे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे मानसिक आजार बरे व्हावेत म्हणून येथे येणारे मनोरुग्णाचे नातेवाईक सैलानी बाबाला नवस करतात. आजार बरा कर, तुला दोन पायाचं, चार पायाचं वाहीन (कोंबडं, बकरा) अशी मन्नत मागतात आणि ठरल्याप्रमाणे सैलानी यात्रेत कोंबडे व बकर्याचा बळी देऊन नवस पूर्ण केल्या जातो.
सैलानी यात्रेत पशूंचा बळी देण्याची ही प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे येथील यात्रेत दरवर्षी हजारो पशूंची हत्या केली जाते. देशाच्या कानाकोपर्यातून येथे आलेले भाविक पाच-पाच दिवस मुक्कामी असतात. त्यांच्यासाठी मोठय़ा प्रमाणावर बैल व रेड्यांची कत्तल केल्या जात होती.
मात्र गोवंश हत्या बंदी कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्याने या कायद्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. लवकरच हा कायदा महाराष्ट्रात लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर सैलानी यात्रेत सुरू असलेली गाय, बैल, गोर्हे या जनावरांच्या कत्तलीला परवानगी नाकारण्यात आली आहे. दरम्यान, सध्या सैलानी यात्रेत बोकड, कोंबडे, म्हैस आणि रेड्यांच्या हत्येवर बंदी नाही.
बैल, गायी, वासरे यांची हत्या करण्यास शासनाने ६ मार्चपासून बंदी आणली आहे. त्यामुळे सैलानी यात्रेत वरील जनावरांना कत्तलीसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. केवळ म्हैस व रेड्याला परवानगी दिली असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी आर.बी. पाचरणे यांनी स्पष्ट केले.