शासकीय परिसरात अतिक्रमण!
By admin | Published: June 15, 2017 12:14 AM2017-06-15T00:14:42+5:302017-06-15T00:14:42+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष : दीड वर्षानंतर शहरातील परिस्थिती ‘जैसे थे’!
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शहरातील बाजाराला जागा अपुरी पडत असून, आठवडी बाजार प्रमुख रस्त्यांसह परिसरातील शासकीय कार्यालयाची जागा व थेट मुख्य दरवाजापर्यंत लघू व्यावसायिकांनी आपले बस्तान मांडले आहे. शहरातील अतिक्रमण काढून आता दीड वर्षांचा काळ लोटल्यानंतर आज शहरात मुख्य मार्गावर अतिक्रमणाने पुन्हा डोके वर काढलेले दिसत आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर डिसेंबर २०१५ ते जानेवारी २०१६ दरम्यान नगरपालिकेकडून शहरातील मुख्य मार्गावरील सर्व अतिक्रमण हटविण्यात आले होते. यात अनेकांचा रोजगार हिरावला गेला. त्यानंतर प्रशासनाकडून या लघू व्यावसायिकांची पर्यायी व्यवस्थाही करून देण्यात आली; मात्र आज शहरातील अतिक्रमणाची परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे. शहराचा विस्तार वाढत असल्यामुळे आता बाजाराची जागा कमी पडू लागल्याने स्टेट बँक चौक ते मेन रोड, मलकापूर रोड, सिनेमा टॉकीज, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा कोषागार कार्यालय व पोस्ट आॅफिस आवारात अतिक्रमणाची दुकाने पोहोचली आहेत. शहरातील मुख्य रस्त्याच्या मधोमध व दुतर्फा अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांनी दुकाने थाटल्यामुळे स्थायी दुकानदारांची परवड होत आहे. आता तर शासकीय कार्यालयाच्या जागेवरही लघू व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत़ येथेच बाजारासाठी आलेले नागरिक आपली वाहने उभी करत असल्याने कार्यालय परिसराला वाहनतळाचे स्वरुप प्राप्त होते. यामुळे शासकीय कार्यालये असुरक्षित झाली आहे.
धोकादायक ठिकाणी लागतात दुकाने !
परिसरातील दूरसंचार कार्यालयाच्या शेजारी मोठे विद्युत रोहित्र आहे. या विद्युत रोहित्राच्या खालीच कापड व्यावसायिक दुकाने लावतात. या उच्चदाब रोहित्रावर स्पार्किंग होऊन कापड दुकानाला आग लागल्यास मोठा अनर्थ घडू शकतो़ काही ठिकाणी अर्थिंगच्या तारेवर कपडे लटकविले जातात.
प्रवेशद्वारापर्यंत अतिक्रमण
शहरातील शासकीय कार्यालयाच्या थेट प्रवेश द्वारापर्यत आज अतिक्रमण झालेले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या भिंतीला खेटून कपड्यांची दुकाने लावली जातात. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर फळ विके्रत्यांनी अतिक्रमण केले आहे, तर जिल्हा कोषागार कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर चहा कॅटिंग, पानठेले लागले आहेत.
दुकाने हटविण्यास विरोध
प्रशासनाने चार वर्षाआधी आठवडी बाजार अन्यत्र हलविण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या; मात्र या भागातील व्यापाऱ्यांनी हा बाजार हलवू दिला नाही़ शहरात दोन ठिकाणी पालिकेच्या जागासुद्धा आहेत़ शहर पोलीस ठाण्याने हा आठवडी बाजार अन्यत्र सुरक्षित ठिकाणी भरवावा, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व नगर प्रशासनास पाठविला होता. यानुसार काही ठिकाणी अतिक्रमण हटविण्यात आले; मात्र ही परिस्थिती त्यानंतर केवळ वर्षभर कायम राहिली आणि लघू व्यावसायिकांनी पुन्हा अतिक्रमण केले.