शासकीय धान्याचा काळाबाजार!
By admin | Published: March 15, 2016 02:16 AM2016-03-15T02:16:19+5:302016-03-15T02:16:19+5:30
मेहकर तालुक्यातील शासकीय गोदामातून कट्टय़ात कमी धान्य येत असल्याचा प्रकार.
मेहकर (जि. बुलडाणा): तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये पुरवठा केल्या जात असलेल्या येथील शासकीय धान्य गोदामामधील गहू व तांदुळाच्या कट्टय़ांमध्ये प्रत्येकी एक ते दोन किलोच्या जवळपास धान्य कमी येत असल्याचा प्रकार १४ मार्च रोजी उघडकीस आला. येथील शासकीय धान्य गोदामाला महिन्याकाठी गहू व तांदुळाचा ९ हजार ७१८ क्विंटल माल येत असून, त्यातील एक टन शासकीय धान्य खुल्या बाजारात जादा दराने विक्रीसाठी जात असल्याचे धक्कादायक वास् तव समोर आले आहे.
गोरगबिांना कमी दरात धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी शासनस्तरावरून अन्नसुरक्षा यांसारख्या विविध योजना राबविण्यात येतात. स्वस्त धान्य दुकानदारांकडे धान्य कमी येत असल्याने काही लाभार्थींंना धान्य वेळेवर पोहोचत नाही. त्यामुळे दुष्काळी काळात त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते. तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना येथील शासकीय धान्य गोदामातून धान्याचा पुरवठा केला जातो. येथे गोदामपाल म्हणून योगेश जंगले हे कार्यरत आहेत. शासकीय धान्य गोदामामध्ये महिन्याला ६ हजार ६६0 क्विंटल गहू व ३ हजार ५८ क्विंटल तांदूळ असा एकूण ९ हजार ७१८ क्विंटल गहू व तांदूळ येतो.
शासकीय गोदामात असलेल्या गहू व तांदुळाच्या प्रत्येकी ५0 किलोच्या कट्टय़ामध्ये एक ते दोन किलोच्या जवळपास धान्य कमी येत असल्याचा प्रकार आ.डॉ. संजय रायमुलकर यांनी १४ मार्च रोजी उघडकीस आणले. ५0 किलोच्या एका कट्टय़ामागे एक ते दोन किलो धान्य कमी याप्रमाणे येथील शासकीय धान्य गोदामात महिन्याकाठी येणार्या एकूण गहू व तांदूळ धान्यापैकी १00 क्विंटल म्हणजे एक टन धान्य जाते कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
एकीकडे धान्याची अफरातफर होत असल्याचे प्रकार घडत आहेत; तर दुसरीकडे अनेक गोरगरीब लाभार्थींंना अन्नधान्यापासून वंचित राहाले लागत आहे. काही गावांमध्ये दुष्काळी परिस्थितीत रेशन वेळेवर पोहोचत नसल्याने लाभार्थींंवर उपासमारीची वेळ येत आहे.