शासकीय धान्याची अफरातफर
By admin | Published: November 13, 2014 12:32 AM2014-11-13T00:32:20+5:302014-11-13T00:32:20+5:30
लोणार तालुक्यातील ४६ क्विंटल धान्याची परजिल्ह्यात परस्पर विक्री.
लोणार (बुलडाणा): गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य मिळण्यासाठी शासनाने स्वस्त धान्य वितरण प्रणाली कार्यान्वित केली; मात्र या योजनेंतर्गत वाटपासाठी येणारे स्वस्त धान्य खर्या लाभार्थ्यांपर्यंत न पोहोचता त्याची जादा दराने काळ्या बाजारात विक्री सुरु आहे. याकडे पुरवठा विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होते आहे. तालुक्यातील गारपीटग्रस्त गाव असलेले पहुर येथील स्वस्त धान्य दुकानदार याने नोव्हेंबर महिन्यातील वाटपासाठी उचललेले ४६ क्विंटल धान्याची परजिल्ह्यात परस्पर विक्री केल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी घडली.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पुरवठा अधिकारी एस.बी.भराडी यांच्या पथकाने पहून येथे जाऊन चौकशी केली असता शासकीय धान्याची अफरातफर केल्याचे आढळून आले. गावातील नागरिकांना स्वस्त दरात गहू, तांदूळ आणि साखरेचे वाटप होण्यासाठी ११ नोव्हेंबर रोजी येथील शासकीय गोदामातून पहूर येथील स्वस्त धान्य दुकानदार आर.एस.मुंढे याने २६ क्विंटल गहू, १८ क्विंटल तांदूळ, २ क्विंटल साखर असे एकूण ४६ क्विंटल स्वस्त धान्य एम.एच.0४ एजी ८४ क्रमांकाच्या ४0७ वाहनात गावात वाटपासाठी भरुन नेले. धान्य गावात न नेता त्याची वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात जादा दराने परस्पर विक्री केली.
शासकीय धान्याची केलेल्या अफरातफरीवरुन सदर दुकानदाराचा परवाना रद्द करुन त्याविरुद्ध अन्न पुरवठा जीवनावश्यक वस्तु कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी भराडी यांनी सांगितले.