शासकीय जमीन बळकावली, सरपंच-सचिवावर गुन्हे दाखल; न्यायालयाच्या आदेशाने झाली कारवाई
By सदानंद सिरसाट | Published: February 12, 2024 06:45 PM2024-02-12T18:45:43+5:302024-02-12T18:47:43+5:30
बनावट दस्तऐवज तयार करून शासकीय जमीन हडपल्याच्या तक्रारी केल्यानंतरही त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही.
खामगाव: बनावट दस्तऐवज तयार करून शासकीय जमीन हडपल्याच्या तक्रारी केल्यानंतरही त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशाने तालुक्यातील शेलोडी येथील महिला सरपंच, सचिवासह सहा जणांवर खामगाव ग्रामीण पोलिसात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. शेलोडी येथील सरपंचासह सहा जणांनी संगनमत करून शासकीय जमिनीचे बनावट दस्तावेज तयार करून परस्पर जमिनी हडपल्याचे प्रकरण समोर आले आहे. सरपंचाने गावातील शासकीय जमिनीवर संगनमताने ताबा करणे, बनावट दस्तऐवज तयार करून जमीन स्वत:च्या नावाने केल्याची तक्रार संतोष तायडे यांनी सातत्याने प्रशासनाकडे केली. त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यामध्ये महिला सरपंच अर्चना सुधाकर इंगळे (२७), तत्कालीन ग्रामपंचायत सचिव राजनंदन विलास गवई (३६), सुनील पुंजाजी इंगळे (४३), महेंद्र सुनील इंगळे (२०), हरिष भगवान इंगळे (३४), मनोज गणेश बानाईत (३२) सर्व रा. शेलोडी यांनी केलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली.
शेलोडी गावातील शासकीय जमिनीवर संगनमत करून ताबा करणे, शासकीय जमिनीचे बनावट दस्तावेज तयार करणे, ती शासकीय जमीन स्वत:चे नावावर करून घेतल्याचे पुढे आले. प्रकरणात सर्वजण दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा आदेश खामगाव ग्रामीण पोलिसांना ९ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने दिला. तसेच सखोल चौकशी करण्याचेही आदेशात म्हटले आहे. यावरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी सरपंच आणि ग्रामसेवकांसह सर्व सहा जणांविरूद्ध कलम ४०९, ४२०, ४६८, ४७९ ३४ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलिस करीत आहेत.