स्थलांतरासाठी शासनाकडून आठवडाभराची मुदत!
By admin | Published: May 26, 2017 01:13 AM2017-05-26T01:13:07+5:302017-05-26T01:13:07+5:30
गजानन महाराज मंदिरनजीकच्या वस्तीचे पुनर्वसन : मुदतीनंतर चालणार गजराज
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : शेगाव विकास आराखडा अंतर्गत शहरातील जुन्या मातंगपुरी या लोकवस्तीचे स्थलांतरण करण्याच्या प्रक्रियेत स्थलांतरीत न झालेल्या कुटुंबियांना स्वयंस्फूर्तीनेस्थलांतरीत करण्यासाठी शासनाने आठवडाभराची मुदत दिली आहे. मुदतीनंतरही स्थलांतरीत न झालेल्या घरांवर चोख पोलीस बंदोबस्तात गजराज चालविल्या जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.
शेगाव येथील जुन्या मातंगपुरी या वस्तीचे पुनर्वसन आळसणा रस्त्यावरील म्हाडाच्या जागेत होत असून यासाठी तयार करण्यात आलेल्या दोन प्रकारच्या संकुलांमध्ये घरे देण्यात आलेली आहेत. या घरांमध्ये येथील कुटूंबीय स्थलांतरीत होणे आतापर्यंत आवश्यक होते. मात्र येथील काही रहिवासी विविध मागण्यांना घेवून मागील १५ दिवसांपूर्वी नगर परिषदेसमोर आमरण उपोषणास बसले होते. यामुळे स्थलांतरणाच्या कार्यवाहीमध्ये अडथळा निर्माण झाला होता. दुसरीकडे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने येत्या ३० तारखेपर्यंत मातंगपुरीतील कुटूंबियांना हलवून तेथील जागा मोकळी करण्याचे आदेश दिले आहेत. यात बुधवारी रात्री उशिरा १९ महिलांचे उपोषण सोडविण्यास प्रशासनाने यश मिळविले आहे. त्यामुळे आता मातंगपुरी येथील घरे पाडण्यास प्रशासनाचा मार्ग मोकळा झाला आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी पुलकूंडवार यांच्या मार्गदर्शनासाठी स्थानिक विश्रामगृहावर सर्व अधिकाऱ्यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत मातंगपुरीतील स्थलांतरीत न झालेल्या कुटूंबियांना स्वयंस्फुर्तीने स्थलांतरीत होण्यासाठी प्रशासनाने आठवडाभराची मुदत दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
याउपरही स्थलांतरीत न झालेल्या घरांवर बुलडोजर चालविण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहितीही प्राप्त झाली आहे. यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली असून आठवडाभरानंतर ८०० पोलीसांचा बंदोबस्त बोलावणार असल्याचे समजते.
सदनिकांचे झाले आहे लॉटरी पद्धतीने वितरण
शेगाव शहरातील मातंगपुरी या भागाचे पुनर्वसन करण्यासाठी शेगाव विकास आराखडा अंतर्गत सदनिकांचे बांधकाम आळसणा रस्त्यावर करण्यात आलेले आहे. या सदनिकांचे लॉटरी पध्दतीने पुनर्वसन होणाऱ्यांना वितरण करण्यात आले आहे. दरम्यान मातंगपुरी भागातील पुनर्वसन झालेल्यांपैकी अनेक जण या सदनिकांमध्ये राहायला गेले आहेत. तर उर्वरित पुनर्वसितांनी सदनिकांमध्ये आपल्या सदनिकांचा ताबा घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.