‘तरूणाई’च्या उपक्रमाला महाराष्ट्र शासनाची साद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 05:01 PM2021-06-16T17:01:29+5:302021-06-16T17:01:36+5:30
Khamgaon News : वृक्ष संवर्धनाच्या ‘खामगाव पॅटर्न’ची राज्यातील सर्वच नागरी भागात जोपासना केली जाणार असल्याचे दिसून येते.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: प्राचीन, अतिप्राचीन वृक्ष संवर्धनाच्या माध्यमातून पर्यावरणाचा वसा स्थानिक तरूणाई फांऊडेशनच्यावतीने जोपासल्या जात आहे. ‘तरूणाई’ने २०१८ पासून सुरू केलेल्या उपक्रमाला आता राज्य शासनाचीही साद मिळत आहे. प्राचीन, अतिप्राचीन वृक्षांच्या संवर्धनासाठी शासनाने विशेष कृती कार्यक्रम १० जून रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत जाहीर केला आहे. त्यामुळे वृक्ष संवर्धनाच्या ‘खामगाव पॅटर्न’ची राज्यातील सर्वच नागरी भागात जोपासना केली जाणार असल्याचे दिसून येते.
राज्याच्या नागरी भागातील ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वृक्षांना ‘हेरिटेज ट्री’असे संबोधून त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा निर्णय १० जून रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ही बैठक मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. यामध्ये ‘हेरिटेज ट्री’ ही संकल्पना आणि त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी, वृक्षाचे वय, भरपाई वृक्षारोपण , मोठ्या प्रमाणात होणारी वृक्ष तोड, महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाची स्थापना, स्थानिक वृक्ष प्राधिकरणाची रचना, कर्तव्ये निश्चित करणे, वृक्ष गणना करणे, वृक्ष लागवडीसाठी सामुहिक जमीन निश्चित करणे, वृक्षांचे पुनर्रोपण, वृक्ष संरक्षणासाठी पयार्यी विकल्पांचा शोध, वृक्ष उपकर आणि दंडाच्या तरतूद या ठळक बाबींचा समावेश आहे.
चौकट...
अशी आहे ‘हेरिटेज ट्री’ ची संकल्पना!
५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे वृक्ष हे ‘हेरिटेज ट्री’ (प्राचीन वृक्ष) म्हणून परिभाषित केले जाईल. हे वृक्ष विशिष्ट प्रजातींचे असू शकतील. अशा प्रजातीं वेळोवेळी अधिसूचित करण्यात येतील. तसेच वृक्ष संवर्धन आणि संगोपनासाठी महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधीकरणाचीही स्थापना केली जाणार आहे. नगर परिषदेच्या बाबतीत वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष ‘मुख्याधिकारी’ राहतील.
‘तरूणाई’ची २०१८ पासून अंमलबजावणी!
-खामगावचा ‘महावृक्ष’ या उपक्रमातंर्गत तरुणाई फांऊडेशनने ५ जून २०१८ पासून शहर आणि परिसरातील प्राचीन आणि अतिप्राचीन वृक्षाच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला. खामगाव शहरासह जिल्ह्यातील वनप्रेमींनी या उपक्रमाचे स्वागत केले. महावृक्षा जोपासणाºयांना ‘तरूणाई’ने गौरवान्वित केले. त्याच उपक्रमाला आता शासन स्तरावरून साद देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील नागरी भागातील प्राचीन, अतिप्राचीन वृक्षांच्या संगोपनाचा, संवर्धनाचा आणि पर्यायाने निसर्ग संवर्धनाचा वसा जोपासल्या जाणार आहे.
- पूर्वजांनी लावलेल्या प्राचीन वृक्षांची जोपासना करणाºया परिवारांचा सत्कार तरूणाईच्यावतीने खामगावचा महावृक्ष उपक्रमातंर्गत सन २०१८ पासून केली जात आहे. या उप्रकमाला आता शासनाची साद लाभली असल्याचे समाधान आहे.
- नारायण पिठोरे
अध्यक्ष, तरूणाई फांऊडेशन, खामगाव