सरकारी दूध संकलनात घट!
By admin | Published: June 3, 2017 12:28 AM2017-06-03T00:28:37+5:302017-06-03T00:28:37+5:30
खासगी संस्था, लघू व्यवसायाकडे वळले जिल्ह्यातील दूध उत्पादक
नीलेश शहाकार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शासनाकडून दूध व्यावसायिकांना मिळणारा कमी भाव, तसेच चारा व पाणीटंचाईसदृश परिस्थितीचा परिणाम जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायावर होत आहे, त्यामुळे यावर्षी जिल्ह्यातील दूध संकलनात मोठी घट आढळून आली आहे. जिल्ह्यात २०१६-१७ मध्ये विविध सरकारी संस्थांकडे केवळ सरासरी ३ हजार ५२२ प्रति.दिन लिटर दूध संकलन करण्यात आले आहे, तर २०१५-१६ मध्ये हा आकडा सरासरी ७ हजार ०७४ प्रति.दिन लिटर होता.
शेतीला पुरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते; मात्र सततच्या दुष्काळी परिस्थितीत व दरवर्षी उन्हाळ्यात पाणी व चाराटंचाईमुळे जिल्ह्यातील दुधाचे उत्पादन कमी होते. त्यातच शासनाकडून शेतकऱ्यांना गाय व म्हैशीच्या दुधासाठी शासकीय दरानुसार केवळ २४ रुपये ते ३७ रुपये लिटरपर्यंत भाव दिला जातो; मात्र तेच खासगीमध्ये दुधाला ३५ रुपये ते ४५ रुपये लिटर भाव आहे. यामुळे सरकारी दूध संकलन केंद्रांकडे पाठ फिरवून शेतकरी पाकीटबंद दूध, चिज निर्मिती करणाऱ्या खासगी संस्था आणि पनीर, खवा, लस्सी, ताक बनविणाऱ्या लघू व्यावसायिकांना दूध विक्री करतात. शिवाय चिल्लर दूध विके्रता ५० रुपये ते ६० रुपये भावाने दूध विकून जास्त नफा मिळत आहे.
जिल्ह्यात ३० ते ३५ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ५०८ दूध संस्था शासकीय व राजकीय अनास्थेमुळे अवसायनात आल्या आहेत. या शिवाय सद्यस्थितीत ७२ सरकारी व सहकारी दूध संस्थांची नोंद जिल्हा निबंधक दुग्ध विकास कार्यालयात आहे. त्यापैकी ४३ बंद आहेत, तर २९ संस्थांमध्ये नियमित दूध पुरवठा सुरु आहे.
मात्र नैसर्गिक व आर्थिक परिस्थितीने खचलेल्या दूध व्यावसायिक शेतकऱ्यांनी या संस्थांकडे पाठ फिरविली आहे. परिणामी सरकारी दूध संकलनात मोठी घट दिसून येत आहे.
बुलडाण्यातील दूध जाते जालना व अकोला जिल्ह्यात
जिल्ह्यात सुरु असलेल्या २९ सहकारी दूध संस्थांमध्ये यावर्षी सरासरी ३५२२ प्रति.दिन लिटर दूध गोळा झाले. यात तालुका दूध संघाकडून देऊळगावराजा येथील दूध संकलन केंद्रात गोळा होणारे दूध जालना जिल्ह्यात आणि जिल्हा संघाकडून चिखली संकलन केंद्रात गोळा करण्यात आले. दूध अकोला जिल्ह्यात पाठविले जाते. नांदूर, मलकापूर, शेगाव या रेल्वे मार्गावर असलेल्या तालुक्यातील दूध मोठ्या प्रमाणात दूध पावडर आणि पॅकेटसाठी जळगाव व नागपूरकडे पाठविले जात आहे.