सरकारी पशुवैद्यकीय डॉक्टर दाखवतात खासगी मेडिकलचा रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 05:41 PM2019-01-18T17:41:21+5:302019-01-18T17:41:41+5:30

बुलडाणा:  जिल्ह्यात काही ठिकाणी गुरांना पायखुरी व तोंडखुरी आजाराची लागन झालेली आहे. या रोगावर प्रतिबंध मिळविण्यासाठी लागणाºया औषधीकरीता पशुवैद्यकीय विभागाकडून पशुपालकांना खासगी मेडिकलवर पाठविल्या जात असल्याचे वास्तव समोर आले आहे.

Government veterinary doctors show that the road of private medical | सरकारी पशुवैद्यकीय डॉक्टर दाखवतात खासगी मेडिकलचा रस्ता

सरकारी पशुवैद्यकीय डॉक्टर दाखवतात खासगी मेडिकलचा रस्ता

Next

-  ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा:  जिल्ह्यात काही ठिकाणी गुरांना पायखुरी व तोंडखुरी आजाराची लागन झालेली आहे. या रोगावर प्रतिबंध मिळविण्यासाठी लागणाºया औषधीकरीता पशुवैद्यकीय विभागाकडून पशुपालकांना खासगी मेडिकलवर पाठविल्या जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. औषधीचे हे बील एक ते दीड हजार रुपयांपर्यंत येत असल्यामुळे दुष्काळी परिस्थितीत पशुपालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
जिल्ह्यात बहुतांश शेतकरी हे पशुसंवर्धन व्यवसायाकडे वळले आहेत. शेतीला पूरक असलेल्या पशुसंवर्धन व्यवसायामुळे अनेकांचा आर्थिक विकास साधला गेल्याचे उदाहरण बुलडाणा जिल्ह्यात पाहावयास मिळते. परंतू या व्यवसायामध्ये पशुधनाची काळजी घेणेही तेवढेच महत्वाचे आहे. एखादा आजार एका जनारावराला झाल्यास इतर जनावरांनाही त्याची लागन होण्यास वेळ लागत नाही. सध्या बदलत्या हवामानामुळे गुरांना पाय व तोंड खुरी या रोगाची लागण झालेली आहे. वेळेवर लसीकरण केल्यास अशा रोगांपासून पशुधनाला वाचविले जाऊ शकते, मात्र सध्या दुष्काळी परिस्थिती असताना जनावरांमध्ये खुरांचे संसर्गजन्य आजार प्रामुख्याने आढळत आहेत. परिणामस्वरूप दुष्काळात पशुपालकांची चिंता वाढली आहे. पशुवैद्यकीय विभागाच्या डॉक्टरांकडून या जनावरांची तपासणी केल्यानंतर गुरांना लागणाºया औषधीसाठी पशुपालकांना खासगी मेडिकलवर पाठविल्या जात असल्याचा प्रकार मेहकर तालुक्यातील ऊमरा देशमुख येथे दिसून आला. त्याचबरोबर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी गुरांच्या तपासणीनंतर त्यांना लागणारी औषधी सरकारी डॉक्टरांकडून एका चिठ्ठीवर लिहून दिल्या जाते. ही औषधी बाहेरून आणण्यासाठी पशुपालकांना एक ते दीड हजार रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागत आहेत. सध्या असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे गुरांच्या औषधीचा खर्च या पशुपालकांना झेपत नाही. त्यामुळे पशुपालक त्रस्त झाले आहेत. 

 
खासगी मेडिकलवरही अर्धवट औषधी
पशुवैद्यकीय दवाखान्याच्या डॉक्टरांनी गुरांची तपासणी करून लिहून दिलेली औषधी ही खासगी मेडिकलवरही पूर्ण मिळत नसल्याची माहिती ऊमरा देशमुख येथील पशुपालक राजेश डोळस, रमेश देशमुख, बंडू खंडारे यांच्यासह काही पशुपालकांनी दिली आहे. त्यामुळे अर्धवटच औषध खासगी मेडिकलवर या पशुपालकांना मिळाली आहे. 

 
गतवर्षी ९३ टक्के गुरांवर औषधोपचार
जिल्ह्यात एकूण पशुधन संख्या १० लाख २० हजार ३७ आहे. त्यात गायवर्ग व म्हैसवर्ग ५ लाख ६७ हजार ७३३, लहान पशुधन (वासरे) गायवर्ग व म्हैसवर्ग ६१ हजार २५७ आहेत. तर शेळी वर्ग १ लाख ७ हजार ३० व मेंढी वर्ग १० लाख २० हजार ३७ आहे. या संपुर्ण गुरांच्या अरोग्याच्यादृष्टीने  लसीकरण व औषधोपचार जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येते. गतवर्षी औषधोपचारासाठी पाच लाख १८९ गुरांच्या औषधोचाराचा लक्षांक जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे ठेवला होता. त्यापैकी ९३ टक्के म्हणजे चार लाख ६९ हजार ५७१ गुरांवर औषधोपचार करण्यात आले.

 
अखेर पथक दाखल
गुरे तोंड व पायखुरी रोगाचे शिकार ठरत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १६ जानेवारी रोजी प्रकाशित केले होते. दरम्यान, या वृत्ताची दखल घेत मेहकर तालुक्यातील ऊमरा देशमुख येथे पशुवैद्यकीय विभागाच्या पथकाने तातडीने भेट देऊन गावातील गुरांची तपासणी केली. याठिकाणी अनेकांच्या पशुधनाला तोंड व पायखुरी रोगाची लागण झाल्याचे आढळून आले. या डॉक्टरांकडून पशुपालकांना औषधी लिहून देण्यात आली. 

 

गुरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्याला औषध पुरवठा केला जातो. परंतू गुरांच्या जखमा जर तीव्र स्वरूपाच्या असतील तर एखाद-दुसरी औषधी ही बाहेरून बोलावली जाते. यामागे गुरांवर चांगाला उपचार व्हावा व त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी, हाच उद्देश असतो. 
- डॉ. किशोर ठाकरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, बुलडाणा.

Web Title: Government veterinary doctors show that the road of private medical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.