शासन आपल्या दारीसाठी धावणार 'लालपरी', मेहकर तालुक्यातून २५ बसेस
By ब्रह्मानंद जाधव | Published: September 1, 2023 05:30 PM2023-09-01T17:30:33+5:302023-09-01T17:31:18+5:30
प्रत्येक कृषी मंडळाला दोन एसटी बसेसचे नियोजन असून मेहकर तालुक्यातून २५ बसेस धावणार आहेत.
मेहकर : शासन आपल्या दारी अभियानाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लाभार्थींना जाता यावे, यासाठी एसटी महामंडळाच्या विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक कृषी मंडळाला दोन एसटी बसेसचे नियोजन असून मेहकर तालुक्यातून २५ बसेस धावणार आहेत.
सुरुवातीला शासन आपल्या दारी अभियानाचा कार्यक्रम मेहकर तालुक्यात नियोजित करण्यात आला होता. जवळपास चार ते पाच वेळा हा कार्यक्रम पुढे ढकलला. मोठा गाजावाजा करून मेहकर तालुक्यात शासन आपल्या दारी अभियानाची तयारी करण्यात आली होती. स्थळ, वेळच निश्चित झाली नाही तर कार्यक्रमासाठी लागणारा मंडप स्टेज उभारणीचे कामही सुरू झाले होते. परंतु मेहकर तालुक्यात काही कारणांमुळे हा कार्यक्रम होऊ शकला नाही. आता शासन आपल्या दारी अभियानाला बुलढाणा येथे मुहूर्त मिळाला आहे. बुलढाणा येथे ३ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांना जाता यावे, यासाठी प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आल्याचे दिसून येते. मेहकर तालुक्यातून २५ एसटी बसेस शासन आपल्या दारी अभियानासाठी बुलढाणा पाठविण्यात येणार आहेत. मेहकर तालुक्यात ११ कृषी मंडळ असून, एका मंडळाला दोन बस देण्यात आल्या आहेत. तसेच इतर मेहकर शहरातून जाणार आहेत.
मेहकर तालुक्यातून १ हजार २०० लाभार्थी
मेहकर तालुक्यातून १ हजार २०० लाभार्थी शासन आपल्या दारी कार्यक्रमाला जाणार असून, त्यांना बुलढाणा येथील कार्यक्रमातून विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे. त्यांच्या प्रवासासाठी प्रशासकीय पातळीवरून एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
मेहकर शहरातून पाच बसेस
मेहकर तालुक्यात २५ बसेस असून त्यापैकी मेहकर शहरातून पाच एसटी बसेस धावणार आहेत. नगर पालिका क्षेत्रातील लाभार्थींना शासन आपल्या दारी अभियानाचा लाभ घेण्यासाठी या बसेसने प्रवास करता येणार आहे.
शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मेहकर तालुक्यातून १ हजार २०० लाभार्थी पाठविण्यात येणार आहेत. या लाभार्थींना विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे. त्यांच्यासाठी बुलढाणा येथे जाण्याकरिता मेहकर तालुक्यातून विशेष बसेसची माेफत व्यवस्था करण्यात आली आहे.
-नीलेश मडके, तहसीलदार, मेहकर.