राज्यपाल ऐकणार शेतक-यांची व्यथा
By admin | Published: November 5, 2014 11:43 PM2014-11-05T23:43:33+5:302014-11-05T23:43:33+5:30
सावजींच्या नेतृत्वात बुलडाणा येथील शेतकरी शिष्टमंडळाला आमंत्रण.
बुलडाणा : सुरुवातीला दडी मारलेल्या पावसाने व शेवटी जोरदार बरसलेल्या पावसाने कापूस आणि सोयाबीन ही दोन्ही पिके हातातून गेली आहेत.
खरीप हंगामाच्या कालावधीत झालेली अतवृष्टी व गारपीट याचाही फटका शेतकर्यांना बसला व आता उत्पादनात घट झाली. त्यामुळे शेतकर्यांना संकटातून सावरण्यासाठी हेक्टरी ५0 हजाराची सरसकट मदत द्यावी, अशी मागणी शासनदरबारी रेटून धरण्याकरिता सर्व लोकप्रतिनिधींना माजी मंत्री सुबोध सावजी यांनी निवेदन दिले. विशेष म्हणजे शेतकर्यांची व्यथा ऐकून घेण्यासाठी राज्यपाल डॉ.विद्यासागर राव यांनीही सावजी यांना आमंत्रित केले असून, ६ नोव्हेंबर रोजी नागपूर येथील राजभवनावर २0 लोकांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार आहे.
जिल्ह्यातील हवालदिल झालेल्या शेतकर्यांच्या व्यथांकडे लक्ष वेधण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष निवेदन देऊन सावजी यांनी राजकीय अभिनिवेष बाजूला ठेवत सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली. या मागणीला सर्वांंनीच सकारात्मक सहकार्य केल्याने ही मागणी आता थेट राज्यपालांच्या दरबारात पोहोचली आहे. राज्यपालांना भेटणार्या शिष्टमंडळात जिल्हा परिषदेचे पदाधिकार्यांसह जिल्हाभरातील विविध पक्षांचे नेते तसेच शेतकर्यांचाही समावेश असणार असल्याची माहिती शैलेश सावजी यांनी दिली आहे.