स्मशानभूमीत तेरवीला १३ महावृक्षांचे केले रोपण!
By admin | Published: July 17, 2017 01:48 AM2017-07-17T01:48:49+5:302017-07-17T01:48:49+5:30
युवकांचा पुढाकार बघून ग्रामपंचायत प्रशासन लागले कामाला
ओमप्रकाश देवकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवराआश्रम: येथील मामा-भाचा यांचे एकाच दिवशी निधन झाल्याने गावावर शोककळा पसरली होती. सर्व विधी आटोपल्यावर शेळके व गावंडे कुटुंबीयांनी तेरवीच्या कार्यक्रमाला बगल देत येथील समस्याग्रस्त स्मशानभूमीत १६ जुलै रोजी तेरवीला तेरा महावृक्षांचे रोपण करून दोन बसण्यासाठी सिमेंट बाक दिले. दु:ख बाजूला सारून वृक्ष लागवड व वृक्ष संगोपनाचे महत्त्व दर्शविणारा एक आदर्श उपक्रम त्यांनी निर्माण केला.
सुधाकर धोंडूबा शेळके व विकास रामेश्वर गावंडे या मामा-भाचा यांचे निधन मंगळवार ४ जुलैला झाले होते. अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत गेले असता स्मशानभूमीची दुरवस्था पाहून शेळके, गावंडे, कुटुंबासह युवक व गावकरी यांनी सदर स्मशानभूमीची साफसफाई करण्याचे ठरविले होते. त्यानुसार साफसफाई करून मुरूम टाकून जेसीबीच्या साहाय्याने लेव्हल करून घेतली. यासंदर्भात ‘लोकमत’ ने वृत्त प्रकाशित केले होते. ग्रामपंचायतीने स्मशानभूमीत आणखी मुरूम टाकला व लेव्हल केली. तसेच शेडचे फुटलेली टिनपत्रे बदलून नवे टिनपत्रे बसवून घेतले. त्यानंतर १६ जुलै रोजी शेळके व गावंडे कुटुंबीयांनी सुधाकर शेळके व विकास गावंडे यांच्या तेरवीच्या कार्यक्रमाला बगल देऊन दु:खाला आवरून स्मशानभूमीत वड, पिंपळ, बदाम, उंबर, सप्तपर्णी अशा १३ महावृक्षांची लागवड मान्यवर व कुटुंबीयांच्या हस्ते केली. दु:ख सावरून वृक्षारोपण करण्याचा हा उपक्रम सर्वांसाठी एक आदर्श ठरत आहे. या वृक्षारोपण कार्यक्रमाला विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष रतनलाल मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर, गटशिक्षणाधिकारी किशोर पागोरे, मुंगशिदेव डाखोरे, अनंत शेळके, मोहन काकडे, भीमराव शेळके, मनोहर गिऱ्हे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दामोधर गारोळे, माजी उपसरपंच मालता वडतकर, मधुकर शेळके, नामदेव शेळके, अरुण गावंडे, प्राचार्य पंढरीनाथ शेळके, विशाल शेळके, पवन शेळके, शिवानंद शेळके, उमेश शेळके, सदानंद शेळके यासह अनेक मान्यवर उपििस्थत होते.
महिलांसमोर निर्माण केला आदर्श
पती व भाचा यांचे एकाच दिवशी निधन झाल्याने स्वर्गवासी सुधाकर शेळके यांच्या पत्नी सुनंदाबाई यांनीसुद्धा दु:ख बाजूला ठेवून पर्यावरणाप्रती आपली सकारात्मक भूमिका निभावत वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारून महिलांसमोर आदर्श उभा केला आहे.