अमरावती येथील धान्य ठेकेदार सहआरोपी
By admin | Published: June 30, 2017 12:32 AM2017-06-30T00:32:42+5:302017-06-30T00:32:42+5:30
रेशनाचा तांदूळ अफरातफर प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली: गत २२ जून रोजी येथून जवळच असलेल्या शेलूद येथे ग्रामस्थांच्या सतर्कतेने काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पकडल्यानंतर या प्रकरणात चिखली पोलिसांनी ट्रकचालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान धान्य वाहतुकीचे जिल्ह्याचे ठेकेदार श्रीनाथ ट्रान्सपोर्ट अमरावतीचे मालक पन्नालाल गुप्ता हेदेखील दोषी असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्ह्यात या ठेकेदारास सहआरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे.
काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा शासकीय वितरण प्रणालीचा सुमारे ४० हजार रुपयांचा ३५० कट्टे तांदूळ व सदर रेशनचा माल वाहून नेणारा ट्रक शेलूद येथील ग्रामस्थांच्या सतर्कतेने चिखली पोलिसांनी पकडला २२ जून रोजी पडकला होता. याप्रकरणी चिखली तहसील कार्यालयातील निरीक्षण अधिकारी अजित शेलार यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक शब्बीर खान बुढन खान वय ४७ वर्षे व ट्रकमालक अब्दुल रफीक अब्दुल रहेमान रा. देऊळघाट यांच्याविरुद्ध गुन्हा करण्यात येऊन आरोपी करण्यात आले होते.
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात सार्वजनिक वितरण प्रणालीचे धान्य वाहतुकीचे बुलडाणा जिल्ह्याचे ठेकेदार श्रीनाथ ट्रान्सपोर्ट अमरावतीचे मालक प्रो.प्रा. पन्नालाल चोखेलाल गुप्ता, रा. शारदा नगर, बडनेरा रोड अमरावती हे दोषी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सदर गुन्ह्यात सहआरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. पुढील तपास बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार महेंद्र देशमुख, पोउपनी प्रल्हाद मदन, पोहेकॉ नारायण तायडे, कैलास जाधव, नापोका राजू सोनोने, पोकॉ शिवानंद तांबेकर करीत आहेत.