धान्य वाहतुकीचा पर्यायी व्यवस्थेवर भार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 03:16 PM2019-07-16T15:16:06+5:302019-07-16T15:16:17+5:30
धान्य वाहतूकीचे कंत्राट निश्चित होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी वाहतूक व्यवस्थेवर जिल्ह्यातील धान्य वाहतूकीचा भार राहणार आहे.
- ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: पुरवठा विभागांतर्गत होणाऱ्या धान्य वाहतुकीचा जिल्ह्यातील कंत्राट संपत असल्याने तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्याच्या हालचाली सध्या जिल्हा पुरवठा विभागामध्ये सुरू आहेत. जिल्ह्यातील धान्य वाहतुकीसाठी २६ वाहने लागतात. दरम्यान, धान्य वाहतूकीचे कंत्राट निश्चित होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी वाहतूक व्यवस्थेवर जिल्ह्यातील धान्य वाहतूकीचा भार राहणार आहे.
गोरगरीबांना वेळेवर धान्य मिळावे, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अधिक पारदर्शकता यावी, अनुषंगाने घरपोच धान्य योजना, द्वारवितरण योजना यासारख्या विविध योजना पुरवठा विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंतर्गत निर्धारीत दराने व योग्य दर्जाचे धान्य शिधापत्रिकाधारकांना उपलब्ध होईल, याची हमी देण्याच्या उद्देशाने सुधारित धान्य वितरण पद्धत राबविण्यात येत आहे. भारतीय अन्न महामंडळ गोदाम ते रास्त भाव दुकानापर्यंत जिल्हावार एकाच वाहतूक दारामार्फत अन्नधान्याची वाहतूक करण्यात येते. यासाठी जिल्हावार वाहतूक कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत धान्य वाहतूकीसाठी जिल्ह्याला जवळपास २६ वाहने लागतात.
सध्या सुरू असलेल्या वाहतूक दाराचा कंत्राट संपुष्टात येत आहे. त्यामुळे सुधारित वितरण पद्धतीनुसार अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे कंत्राट निश्चित होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून वाहतुकदारांना प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार ट्रान्सपोर्ट कंपन्यांचे दरपत्रकानुसार प्रस्ताव पुरवठा विभागाकडे आले असून, त्याची पडताळणी सध्या सुरू आहे.
सात ‘ट्रान्सपोर्ट’ कंपन्यांचा पुढाकार
धान्य वाहतूक कंत्राट निश्चित होईयर्पंत तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यासाठी वाहतूक दारांकडून दरपत्रकासह प्रस्ताव मागविण्यात आले होते. वाहतूकदारांना सर्व कागदपत्रे व दरपत्रक पुरवठा कार्यालयाकडे सादर करण्यासाठी ५ जुलै ते ११ जुलैचा कालावधी देण्यात आला होता. या कालावधीत सात ट्रान्सपोर्ट कंपन्यांनी वाहतूकीसाठी प्रस्ताव पाठविले आहेत.
अशी राहणार वाहतूक
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत जिल्ह्याचे सरसारी नियतन १२ हजार ४६० मे. टन आहे. पर्यायी वाहतूक व्यवस्थे अंतर्गत वाहतूकदारांना भारतीय खाद्य निगम खामगाव ते शासकीय गोदापर्यंत वाहतूक करावी लागणार आहे. त्यानंतर एमआयडीसी गोंदीया ते शासकीय धान्य व शासकीय धान्य गोदाम ते जिल्ह्यातील १ हजार ५३७ रास्त भाव दुकान अशी धान्याची वाहतूक चालणार आहे.
धान्य वाहतूकीचा पुढील कंत्राट निश्चित होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात येत आहे. परंतू जोपर्यंत पर्यायी व्यवस्था होत नाही, तोपर्यंत पुर्वीचाच कंत्राटदार राहिल. पर्यायी वाहतूक व्यवस्थेसाठी सात प्रस्ताव आले आहेत. या सातपैकी ज्यांची कागदपत्रे बरोबर आहे, त्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल.
- गणेश बेलाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, बुलडाणा.