अकोला येथील गोदामातून धान्य उचल पुन्हा विस्कळीत!

By अनिल गवई | Published: March 21, 2024 09:26 PM2024-03-21T21:26:14+5:302024-03-21T21:26:32+5:30

बुलढाणा जिल्ह्याला प्राधान्याने धान्य वितरणाचे जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र

Grain picking from warehouse in Akola disrupted again | अकोला येथील गोदामातून धान्य उचल पुन्हा विस्कळीत!

अकोला येथील गोदामातून धान्य उचल पुन्हा विस्कळीत!

खामगाव: भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या अकोला येथील गोदामातून धान्य उचलीचा तिढा कायम असल्याने, बुलढाणा जिल्ह्यातील धान्य वितरण व वाहतूक प्रणाली पुर्णत: विस्कळीत झाली आहे. ही बाब निदर्शनास येताच जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी भारतीय अन्नधान्य महामंडळाला बुलढाणा जिल्ह्याला प्राधान्याने आणि त्वरीत धान्य पुरविण्याबाबतचे पत्र दिले आहे.

प्राप्त माहितीनुसार, भारतीय अन्न धान्य महामंडळाच्या अकोला येथील गोदामातून अकोला, वाशिम, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यासाठी धान्याची उचल केली जात आहे. परिणामी, भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या अकोला येथील गोदामातील व्यवस्थापन ढासळले आहे. त्याचा फटका बुलढाणा जिल्ह्यातील धान्य वितरण आणि वाहतूक प्रणालीला बसत आहे. जिल्ह्यातील १६ पैकी अनेक शासकीय गोदामातून वेळेवर धान्य पुरविले जात नाही. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातूनही धान्याचे वितरण रखडल्याचे दिसून येते. या सर्व प्रकारामुळे धान्य वितरणात पहिल्या तीन असलेला बुलढाणा जिल्हा आता शेवटच्या क्रमांकावर पोहचला आहे. अकोला येथून धान्य वेळेवर मिळत नसल्याने, गोदाम बदलवून देण्याची मागणी जोर धरत आहे.
 
सणासुदीत धान्याचा तुटवडा
सुटीच्या दिवशी धान्य वितरीत करण्याची पुरवठा विभागाची मागणी भारतीय खाद्य महामंडळाने धुडकावली आहे. मागील तीन महिन्यांपासून नियमित व पूर्ण क्षमतेने धान्याची उचल मिळाली नाही. परिणामी, बुलढाणा जिल्ह्यात ऐन होळी आणि पाडवा सणाच्या तोंडावर धान्याचा तुटवडा निर्माण होत आहे.
 
वाहने भरून मिळत नसल्याची तक्रार
अकोला येथील गोदामात उपलब्ध असलेली सर्व वाहने अकोला येथील गोदामातून भरून मिळत नसल्याची तक्रार जिल्हा वाहतूक प्रतिनिधी यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ््यांकडे केली आहे. वाहने भरून दिली जात नसल्याचा प्रकार अनेकवेळा घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
 
पूर्ण क्षमतेने उचल नाही

मार्च महिन्यात सुट्टीच्या दिवशी व रॅक येण्याच्या दिवशी उचल न दिल्याने अवघे १० ते १२ दिवस धान्याची उचल मिळाली. परिणामी, बुलढाणा जिल्ह्याला पूर्ण क्षमतेने धान्य मिळाले नाही. ही बाब जिल्हाधिकारी डॉ. िकरण पाटील यांनी हेरली, हे येथे विशेष!
 
बुलढाणा जिल्हाला प्राधान्याने आणि त्वरीत धान्य वितरीत करण्याच्या सूचना भारतीय अन्नधान्य महामंडळाला दिल्या आहेत. महिन्याच्या १० तारखेनंतर देखील धान्य वितरणास मंजूरी देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे.
डॉ. किरण पाटील
जिल्हाधिकारी, बुलढाणा

Web Title: Grain picking from warehouse in Akola disrupted again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.