शाळेतील धान्य साठा, विद्यार्थ्यांची गोळाबेरीज सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 12:31 PM2020-03-30T12:31:19+5:302020-03-30T12:31:52+5:30
तांदूळ व डाळी किंवा कडधान्याचे विद्यार्थ्यांना तसेच हंगामी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना वितरीत करण्याचे निर्देश शिक्षण संचालकांनी दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुटी आहे. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिल्लक असलेला तांदूळ, डाळी व कडधान्याचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठी शाळेतील धान्य साठा आणि विद्यार्थ्यांची गोळाबेरीज सुरू झाली आहे. विद्यार्थी अथवा पालक आजारी असल्यास त्या विद्यार्थ्यांचे तांदूळ, डाळी घरपोच दिल्या जाणार आहे.
कोरोनाची दहशत सर्वत्र निर्माण झाली आहे. कोरोनामुळे राज्यातील सर्व सरकारी व खासगी शाळा, अंगणवाडी बंद आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचे धान्य शाळेतच पडून आहे. राज्यातील विद्यार्थ्यांचे पोषण होण्याच्या दृष्टीने आहार देणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील शाळा स्तरावर शिल्लक असलेला तांदूळ व डाळी किंवा कडधान्याचे विद्यार्थ्यांना तसेच हंगामी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना वितरीत करण्याचे निर्देश शिक्षण संचालकांनी दिले आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये नियोजन करण्यात येत आहे.
तांदूळ, डाळी व कडधान्य वस्तू नेण्यासाठी शाळा स्तरावर गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या अनुषंगाने शाळेतील विद्यार्थी व त्यांचे पालक यांना टप्प्या टप्याने शाळेमध्ये बोलविण्यात येणार आहे. त्यानंतर तांदूळ व डाळी, कडधान्य आदीचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थी किंवा पालक आजारी असल्यास अशा विद्यार्थ्यांचे तांदूळ, डाळी, कडधान्य घरपोच दिले जाणार आहे. जिल्हा परिषकडून सर्व शाळांना सुचना दिल्या आहेत. त्यानुसार सध्या हालचाली सुरू आहेत.
ग्रामीण भागातील शाळांमध्ये शालेय पोषण आहार अंतर्गत शिल्लक असलेल्या तांदूळ, डाळी, कडधान्ये यांचे विद्यार्थ्यांना वाटप करणेबाबत सर्व गटशिक्षाणिकारी व मुख्याध्यापकांना सुचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत गर्दी जमा होणार नाही व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची संपूर्ण दक्षता व काळजी घेतली जाणार आहे.
- एजाज खान, शिक्षणाधिकारी, प्राथमिक बुलडाणा.