रेशनचा काळाबाजार रोखण्यासाठी धान्य वाहतूक आता आॅनलाईन पासद्वारे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 18:55 IST2018-06-07T18:55:46+5:302018-06-07T18:55:46+5:30
खामगाव : रेशनच्या धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सरसावले असून रेशनच्या धान्याची वाहतूक आता आॅनलाईन पासद्वारे करण्यात येणार आहे.

रेशनचा काळाबाजार रोखण्यासाठी धान्य वाहतूक आता आॅनलाईन पासद्वारे!
खामगाव : रेशनच्या धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सरसावले असून रेशनच्या धान्याची वाहतूक आता आॅनलाईन पासद्वारे करण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाचे निर्देश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून, धान्य वाहतूक आॅनलाईन पासद्वारे करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी पुढाकार घेतला आहे. धान्य वाहतुकीतील काळाबाजार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून ‘लोकमत’वृत्तांची गंभीर दखल घेत, आॅनलाईन पासद्वारे धान्य वाहतूक ही व्यवस्था कार्यान्वित केली, हे येथे उल्लेखनिय!
जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत १६ शासकीय गोदामे आहेत. या धान्य गोदामांमध्ये खामगाव येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामामधून धान्य पाठविण्यात येते. दरम्यान, भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून निघालेल्या धान्याची वाटेत अफरातफर केल्या जात असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते. धान्य वाहतूक पासवर गंतव्य स्थानासोबतच अन्न महामंडळाच्या गोदामावरून निघालेली वाहने विलंबाने पोहचत असून, या वाहनांमध्ये धान्य कमी येत असल्याच्या तक्रारींचा मुद्दाही ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला. परिणामी, जिल्हा प्रशासनाने ‘लोकमत’ वृत्तांची गंभीर दखल घेत, आॅनलाईन पासची यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेतंर्गत जिल्हा पुरवठा कार्यालयाचे वाहतूक प्रतिनिधी सदर धान्य वितरणाचे नियंत्रण करून अभिलेख तयार करण्याचे काम करीत असून या अभिलेखाच्या आधारे वाहतूक कंत्राटदाराचे देयक अदा करण्यात येते. खामगाव येथील भारतीय खाद्य निगमच्या गोदामामधून निघालेल्या वाहनाचा संपूर्ण तपशील आॅनलाईन भरण्यात येतो. त्यामुळे सदर वाहनाची माहिती गोदाम पालकापासून ते मंत्रालयापर्यंत सर्वांना सहज उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे. तसेच या प्रणालीमुळे वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. अप्पर तथा प्रभारी जिल्हाधिकाºयांच्या या आदेशामुळे रेशनच्या धान्याच्या काळ्या बाजाराचा आळा बसणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान, यामुळे रेशन धान्याचा काळा बाजार करणाºया ‘साखळी’चे धाबे दणाणले आहे.
गोदामपालांना जिल्हाधिकाºयांचे निर्देश!
धान्य वाहतूक ही केवळ शासनमान्य वाहनातूनच करण्यात यावी. सदर वाहनाला हिरवा रंग दिलेला असावा, त्यावर सार्वजनिक वितरण व्यवस्था सुधारित धान्य वितरण पद्धत महाराष्ट्र शासन असे लिहिलेले असावे, असे असेल तरच धान्य गोदामात उतरवून घ्यावे अन्यथा उतरवून घेण्यात येवू नये, तसेच धान्य उतरवून घेण्याची संपूर्ण प्रक्रिया ही सीसीटीव्ही कॅमेºयाच्या कार्यक्षेत्रात करून घ्यावी, या प्रक्रियेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून घ्यावे, याव्यतिरिक्त द्वारपोच योजनेतंर्गत धान्य रास्त भाव दुकानदारांना देतेवेळी त्याचा पंचनामा न चुकता करावा, पंचनाम्यावर पंचांच्या स्वाक्षºया घ्याव्यात अशा प्रकारच्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.