Gram Panchayat Election : जातवैधतेसाठी इच्छुक उमेदवारांची कसरत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 11:56 AM2020-12-22T11:56:21+5:302020-12-22T11:56:44+5:30
Gram Panchayat Election : हमीपत्रासाठी मुद्राकांचा तुटवडा, तर तहसीलदारांच्या संदर्भपत्रासाठी उमेदवारांची दमछाक होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागेवर लढणाऱ्या उमेदवारांना अर्ज दाखल करताना समितीकडे जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची पोचपावती व हमीपत्र द्यावे लागत आहे. त्यासाठी उमेदवारांची सर्वत्र कसरत सुरू झाली आहे. हमीपत्रासाठी मुद्राकांचा तुटवडा, तर तहसीलदारांच्या संदर्भपत्रासाठी उमेदवारांची दमछाक होत आहे.
ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम ११ डिसेंबर रोजी जाहीर झाला. त्यानुसार आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणार असल्याचे हमीपत्र द्यावे लागत आहे. तसेच जिल्हा जात पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची पोचपावती लागणार आहे. ही प्रक्रिया ऐन निवडणुक कालावधीत सुरू झाल्याने महिला उमेदवारांसाठी कमालीचा त्रास वाढला आहे. इच्छुक उमेदवारांची जात वैधता प्रमाणपत्रांसाठी दमछाक हाते असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.
वेबसाइट हँग
जातवैधतेसाठी ऑनलाइन अर्ज बार्टीच्या नावे करावा लागतो. त्यासाठी वेबसाइटचा वापर केला जातो. मात्र, राज्यात एकाचवेळी अर्ज सादर करणे सुरू असल्याने ती वेबसाइट हँग होत असल्याचा प्रकारही घडत आहे.
त्यातच नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या कालावधीत तीन दिवस सुटी असल्याने उमेदवारांनी त्याचाही धसका घेतला आहे.अनेक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
मुद्रांकाचा तुटवडा
शहरात गेल्या अनेक दिवसांपासून १०० रुपयांच्या मुद्रांकांचा तुटवडा आहे. त्याकडे वकिलांच्या संघटनेने सातत्याने लक्ष वेधले. त्यावर तोडगा निघाला नाही.
आता निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना विविध शपथपत्रे द्यावी लागतात. त्यासाठी मुद्रांकांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातून उमेदवारांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रकारही सुरू झाला आहे. त्यामुळे, याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.