Gram Panchayat Election : ५० जणांची सभा, प्रचारासाठी एक चारचारी, दोन दुचाकींची मुभा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 12:42 PM2020-12-25T12:42:10+5:302020-12-25T12:42:20+5:30
Gram Panchayat Election: केवळ ५० जणांचीच सभा घेता येणार असून, १ चारचाकी वाहन व दोन दुचाकीवर कार्यकर्ते घेऊन जाता येणार आहे.
- विवेक चांदूरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, आचारसंहिता लागू झाली आहे. यावेळच्या आचारसंहितेत कोरोनामुळे बरेच बदल झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार करताना उमेदवारांना एकावेळी केवळ ५० जणांचीच सभा घेता येणार असून, १ चारचाकी वाहन व दोन दुचाकीवर कार्यकर्ते घेऊन जाता येणार आहे.
कोरोनामुळे दरवेळीपेक्षा निवडणूक प्रचाराच्या नियमात निवडणूक आयोगाने बराच बदल केला आहे. प्रचार करताना मोठ्या सभा घेता येणार नसून, ५० जणांची मऱ्यादा आहे. तसेच केवळ १ चारचाकी वाहन व दोन दुचाकींवरून कार्यकर्त्यांसोबत फिरता येणार आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत प्रचारादरम्यान संसर्ग वाढू नये, याची खबरदारी घेतली जात आहे. यात उमेदवारासह केवळ पाच व्यक्तींच्या गटाला घरोघरी जाऊन प्रचार करण्याची परवानगी मिळणार आहे. एकाचवेळी केवळ पाच कार्यकर्तेच एकत्र येऊन प्रचार करू शकतात. निवडणुकीदरम्यान नागरिकांनी एकत्र येणे, मिरवणुकीचे आयोजन करणे यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांद्वारा निकष लावण्यात आले आहेत. मेळाव्याच्या प्रवेशासाठी बाहेर पडण्याची स्वतंत्र व्यवस्था असणाऱ्या मैदानाची पाहणी करण्यात येणार आहे. याशिवाय सामाजिक अंतराच्या दृष्टीने चिन्हांकित खुणा करण्यात येणार आहेत. कोरोनासंदर्भातील मार्गदर्शन तत्त्वे पाळली जातात की नाही, याविषयी नोडल अधिकारी लक्ष देणार आहेत. उमेदवारांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या खबरदारीसाठी फेसमास्क, सॅनिटायझर, थर्मल स्क्रीनिंग आदींच्या पूर्ततेची शहानिशा करावी लागणार आहे. या तरतुदीचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई होईल.
उमेदवारांना केवळ ५० जणांची सभा घेण्याचीच परवानगी आहे. तसेच प्रत्येक उमेदवाराला केवळ एक चारचाकी वाहन व दोन दुचाकी वाहनांचाच प्रचारासाठी वापर करता येणार आहे.
- शीतल रसाळ,
तहसीलदार, खामगाव