...तोपर्यंत ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध झाल्याचे समजले जाणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 12:03 PM2021-01-06T12:03:20+5:302021-01-06T12:11:38+5:30
Gram Panchayat Election: ग्रामस्थांनी खरोखरच सुजाणपणे घेतला की त्यामध्ये पैशाचे आमिष, धाकदपटशा झाली, याबाबीची पडताळणी आता तहसीलदारांकडून केली जाणार आहे.
- सदानंद सिरसाट
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : ग्रामपंचायतीची निवडणूक होण्याऐवजी त्या जागांसाठी प्रत्येकी केवळ अर्ज दाखल करून सर्व जागांवर सदस्यांची अविरोध निवड करण्याचा प्रयत्न अनेक गावांमध्ये झाला. तो प्रकार ग्रामस्थांनी खरोखरच सुजाणपणे घेतला की त्यामध्ये पैशाचे आमिष, धाकदपटशा झाली, याबाबीची पडताळणी आता तहसीलदारांकडून केली जाणार आहे. तोपर्यंत त्या ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध झाल्याचे समजले जाणार नाही, असे पत्र निवडणूक आयोगाने पाच दिवसांपूर्वीच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
लोकशाही बळकट करण्यासाठी पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आली. त्यामध्ये ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद अशी यंत्रणा निर्माण झाली. या सर्वच यंत्रणांचा कारभार पाहण्यासाठी निवडणुकीच्या माध्यमातून लाेकप्रतिनिधी निवडले जातात. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, चालू ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यातील काही आमदारांनी शासकीय निधी देण्याचे आमिष दाखविले, तर काही ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच पदासाठी लिलाव करण्यात आला. त्यातच काही गावांमध्ये गावगुंड प्रवृत्तीमुळे उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासही मज्जाव केला जाण्याची शक्यता आहे. या सर्व शक्यता पाहता निवडणूक आयोगाने आधीच अविरोध निवड होणे, संपूर्ण ग्रामपंचायतीचे सदस्य अविरोध होणे, याबाबत तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून पडताळणी करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार चालू निवडणुकीत अविरोध होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींची प्रत्यक्ष गावात जाऊन तहसीलदार पडताळणी करून निवडणूक आयोगाकडे अहवाल सादर करणार आहे. आयोगाची खात्री झाल्याशिवाय संबंधित निवडणूक अविरोध झाल्याचे जाहीर केले जाणार नाही. त्यामुळे पडताळणी होईल.
निवडणूक आयोगाने पाच दिवसांपूर्वीच तसे पत्र दिले आहे. त्या पत्रानुसार अविरोध ग्रामपंचायतींबाबत तहसीलदारांचा प्रत्यक्ष पडताळणी अहवाल घेतला जाणार आहे.
- दिनेश गिते,
उपजिल्हा निवडणूक अधिकारी, ग्रामपंचायत