ग्रामपंचायतींना मिळणार कामगिरीवर आधारित निधी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 01:15 AM2017-11-07T01:15:53+5:302017-11-07T01:16:07+5:30
बुलडाणा: १४ व्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायतींना कामगिरीवर आधारित थेट निधी मिळणार आहे. यासाठी ग्रामपंचायतींचे भौगोलिक क्षेत्र, कर वसुली, पायाभूत सुविधांचा दर्जा पाहून त्यांचे मूल्यांकन केले जाणार आहे.
हर्षनंदन वाघ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: १४ व्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायतींना कामगिरीवर आधारित थेट निधी मिळणार आहे. यासाठी ग्रामपंचायतींचे भौगोलिक क्षेत्र, कर वसुली, पायाभूत सुविधांचा दर्जा पाहून त्यांचे मूल्यांकन केले जाणार आहे. याबाबत निधी वितरणाचे निकष व सनियंत्रणाचे मार्गदर्शक सूचना ग्रामविकास विभागाने जारी केल्या असून, निधी मिळविण्यासाठी पदाधिकारी आणि अधिकार्यांचा कस लागणार आहे.
१४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामीण स्तरावर मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. त्यामुळे बळकटीकरणासाठी संपूर्ण अनुदान ग्रामपंचायत स्तरावर देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने यापूर्वीच घेतला आहे; मात्र हा निधी मिळविण्यासाठी शासन निकषाचे पालन करावे लागणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीला स्वउत्पन्नात वाढ करून लेखे अद्ययावत ठेवणे व लेखापरीक्षणही करणे आता बंधनकारक आहे. १४ व्या वित्त आयोगाचा निधी मिळण्यासाठी दोन वर्षाच्या कालावधीतील लेखापरीक्षण अहवालाचा विचार केला जाणार आहे. ग्रामपंचायतीचे लेखे अचूक व पूर्ण लेखेविहित वेळेत परीक्षणासाठी उपलब्ध करण्याची जबाबदारी ग्रामसेवकावर आहे.
ग्रामस्थांना देण्यात येणार्या सेवांचा खर्च त्यांच्याकडून वसूल केला पाहिजे. ग्रामपंचायतींनी त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत बळकट करणे आवश्यक आहे.
उत्पन्नवाढीसाठी दर चार वर्षांनी फेरआकारणी करणे आवश्यक आहे. जमीन महसूल, मुद्रांक शुल्क, गौण खनिजसारख्या स्वउत्पन्नाबाबतचा पाठपुरावा करणे ग्रामविकास विभागाला अपेक्षित आहे.
आतापर्यंत मिळाला १३७ कोटींचा निधी
१४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार ग्रामीण स्वराज्य संस्थांना त्यांच्या बळकटीकरणासाठी २0१५-१६ या आर्थिक वर्षापासून पुढील पाच वर्षासाठी पंचायत राज संस्थांच्या अधिकारात, कामात आणि हस्तांतरित करण्यात येणार्या निधीत व्यापक सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत कामगिरीच्या आधारावर १३७ कोटींच्या निधीचे वाटप करण्यात आले आहे. आर्थिक स्थितीच्या बळकटीशिवाय ग्रामपंचायती चांगले काम करू शकणार नाही.
लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्रानुसार मिळणार निधी
जिल्ह्यातील सहभागी ८६९ ग्रामपंचायतींना त्यांच्या लोकसंख्येनुसार तसेच भौगोलिक क्षेत्रानुसार निधी मिळणार आहे. शासनाकडून जिल्ह्याला मिळालेला निधी हा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना त्यांच्या मूल्यांकनानंतर लोकसंख्येनुसार ९0 टक्के व भौगोलिक क्षेत्रानुसार १0 टक्के मिळणार आहे.
मूल्यांकनानंतर मिळणार अधिक १0 टक्के निधी
८६९ ग्रामपंचायतींना लोकसंख्या व भौगोलिक क्षेत्रानुसार मिळालेल्या निधीच्या १0 टक्के अधिक निधी ग्रामपंचायतींच्या मूल्यांकनानुसार खर्च करता येईल. मूल्यांकनानंतर ४९ पर्यंत गुण असल्यास मंजूर निधीच्या ५0 टक्के, ५0 ते ६0 दरम्यान गुण असल्यास ७0 टक्के, ६१ ते ७0 दरम्यान गुण असल्यास ८0 टक्के तर ७१ टक्क्यांपेक्षा अधिक गुण असल्यास मंजूर निधीच्या १00 टक्के प्रमाणात विकास निधी मिळणार आहे.