ग्रामसेवकास तीन हजारांची लाच घेतांना अटक,
By निलेश जोशी | Published: March 29, 2023 08:00 PM2023-03-29T20:00:30+5:302023-03-29T20:00:38+5:30
बुलढाण्यातील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रातच केली कारवाई
बुलढाणा: शेत जमीन अकृषक नसतांना देऊळगाव मही ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आलेली नुमना आठ अ ची करण्यात आलेली नोंद रद्द करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वाकारतांना देऊळगाव मही येथील ग्रामसेवकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडेल. ही कारवाई २९ मार्च रोजी बुलढाणा येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रामध्ये सायंकाळी करण्यात आली.
विजय साहेबराव रिंढे (५०, रा. शेलसूर, ता. चिखली) असे अटक करण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. या प्रकरणी देऊळगाव मही येथील ४२ वर्षीय व्यक्तीने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुषंगाने २९ मार्च रोजीच पडताळणी करून सापळा रचत ही कारवाई करण्यात आली. देऊळगाव मही येथील एका व्यक्तीची शिवारातच सामायिक शेत जमीन आहे.
या जमीनीवर गावातील काही लोकांनी अतिक्रमण केलेल आहे. शेत जमीन अकृषक नसतांनाही ग्रामपंचायतीमध्ये नमुना आठ अ ची नोंद केल्या गेली होती. ती रद्द करण्यासाठी संबंधित व्यक्तीने देऊळगाव राजा पंचायत समितीकडे अर्ज केला होता. संबंधित अर्ज नंतर ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आला. प्रकरणी ग्रामसेवक विजय रिंढे यांनी तीन हजार रुपयांची लाच मागितली होती. प्रकरणी संबंधित व्यक्तीने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुषंगाने २९ मार्च रोजी सापळा रचून विजय रिंढे याला लाच स्वीकारतांना बुलढाणा येथील ग्राम प्रशिक्षण केंद्राच्या परिसरामध्ये रंगेहात पकडण्यात आले.
ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन इंगळे, पोलिस हवालदार विलास साखरे, पोलिस नायक प्रवीण बैरागी, विनोद लोखंडे, जगदीश पवार, महिला पोलिस कॉन्स्टेबल स्वाती वाणी व सहकाऱ्यांनी केली.