हरभऱ्याची सुडी जाळली, ५० हजारांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:36 AM2021-04-09T04:36:34+5:302021-04-09T04:36:34+5:30
शिंदी येथील प्रकाश कडूबा बंगाळे हे ८ एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे शेतामध्ये पाहणी करण्यासाठी सकाळी ६.३० वाजता गेले ...
शिंदी येथील प्रकाश कडूबा बंगाळे हे ८ एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे शेतामध्ये पाहणी करण्यासाठी सकाळी ६.३० वाजता गेले असता त्यांना शेतातील दोन एकरातील लावलेली हरभऱ्याची सुडी जळालेल्या अवस्थेत दिसली. दोन एकरातील हरभऱ्याची सुडीची अंदाजे किंमत ५० हजार रुपये इतकी आहे. यामध्ये सात वर्षांचे संत्राचे झाडे सुद्धा होरपळून गेली आहेत. या घटनेची माहिती तातडीने तलाठी नागरे यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. प्रकाश बंगाळे यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस काॅन्स्टेबल अरविंद चव्हाण यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. यावेळी बद्री वायाळ, पोलीस पाटील मदन हाडे, श्रीधर खरात, सचिन खंडारे हजर होते. सुडी जाळणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला.
अगोदरच शेतकरी लाॅकडाऊन काळामध्ये आपला माल हमी भावांमध्ये विकू शकत नाही. अशातच अल्पभूधारक शेतकरी असलेले प्रकाश बंगाळे यांच्या शेतातील हरभऱ्याची सुडी जाळल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. जळालेली सुडीची अवस्था पाहून तेही हतबल झाले. यामुळे हरभऱ्याच्या सुडी बरोबर शेतातील साहित्य तसेच ठिबक सिंचनचे केबल सुद्धा जळाली आहे. पुढील तपास साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अरविंद चव्हाण हे करत आहेत.