ग्रामपंचायतीत ‘गुड्डा-गुड्डी’ फलक!

By Admin | Published: June 17, 2017 12:14 AM2017-06-17T00:14:15+5:302017-06-17T00:14:15+5:30

फलकावर लागणार नवीन जन्मलेल्या मुलींचे फोटो

Grampanchayat 'Guddha-Guddi' panel! | ग्रामपंचायतीत ‘गुड्डा-गुड्डी’ फलक!

ग्रामपंचायतीत ‘गुड्डा-गुड्डी’ फलक!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत गुड्डा - गुड्डी फलक तयार करून त्यावर नवीन जन्मलेल्या मुलींचे फोटो लावा, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी षण्मुखराजन एस. यांनी मंगळवारी सरपंच व ग्रामसेवकांना केले.
स्थानिक सहकार विद्यामंदिर येथील सांस्कृतिक सभागृहात आयोजित सरपंच, ग्रामसेवकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जिल्हा परिषद सीईओ यांनी सरपंच व ग्रामसेवकांना ग्रामपंचायतीत फलक लावण्याचे सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प अध्यक्ष उमाताई तायडे, आमदार हर्षवर्धन सपकाळ, आमदार डॉ. शशीकांत खेडेकर, जिल्हाधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प. सभापती श्वेताताई महाले, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीणा, जि.प. सदस्य सिनगारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जि.प. सदस्य जयश्री शेळके, नीता खेडेकर, सविताताई बाहेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, की मुलींचा घसरता जन्मदर हा कुठल्याही समाजाला भूषणावह नाही. प्रत्येक समाजाने मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जनजागृती करावी. स्त्री लिंग गुणोत्तर प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी शासकीय स्तरावर विविध उपक्रमांच्या माध्यमातून कार्य होत असते. केंद्र शासनाने हेच हेरून ‘बेटी बचाओ- बेटी पढाओ’ मोहीम देशभर सुरू केली आहे. या मोहिमेत सर्वांनी सहभाग नोंदवून मुलींच्या जन्माचे स्वागत करावे, असे आवाहन पुलकुंडवार यांनी केले.
यावेळी उमाताई तायडे यांनी बेटीच्या सन्मानासाठी कुटुंबाने शौचालय बांधण्याचे आवाहन केले. तसेच आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी बेटीचे कुटुंबातील महत्त्व विशद करीत आपले गाव १०० टक्के हगणदरीमुक्त करण्यावर भर दिला. आमदार डॉ. शशीकांत खेडेकर यांनीही समाजाने मानसिकता बदलवून स्त्री जन्माचे स्वागत करण्याचे मत मांडले. सभापती श्वेताताई महाले यांनी मुलींकरिता गर्भलिंग निदान न करणे, मुला-मुलीत भेदभाव न करणे याबाबत उपस्थिताना शपथ दिली. पोलीस अधीक्षक मीणा यांनी पोलीस विभागाच्यावतीने मुलींच्या संरक्षणाकरिता हाती घेतलेल्या उपक्रमाची माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन यांनी सर्व ग्रामपंचायतींना गुड्डा-गुड्डी बोर्ड व नवीन जन्मलेल्या मुलींचे फोटो संग्रहित करून ग्रा.पं. कार्यालयात लावण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार यांनी केले. कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) मेसरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यादव, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र गोफणे, साथरोग अधिकारी डॉ. विजय पाटील यांच्यासह जिल्हाभरातील सरपंच व ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Grampanchayat 'Guddha-Guddi' panel!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.