ब्रिटिश दाम्पत्य अनुभवतेय ग्रामसंस्कृती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 12:10 AM2017-08-17T00:10:06+5:302017-08-17T00:10:16+5:30
बुलडाणा : भारतीय परंपरा आणि संस्कृतीचे मूळ हे ग्रामीण भागात आहे. त्यामुळे ग्राम संस्कृती जाणून घेण्यासाठी आणि महाराष्ट्रातील सण, उत्सव जवळून पाहण्यासाठी एक ब्रिटिश दाम्पत्य महिनाभरासाठी महाराष्ट्रात आले आहे. या ब्रिटिश दाम्पत्याने १३ ऑगस्ट रोजी बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या सप्तऋषींपैकी गोमेधर येथील मंदिर परिसर पाहून कुतूहल व्यक्त केले.
ब्रह्मनंद जाधव।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : भारतीय परंपरा आणि संस्कृतीचे मूळ हे ग्रामीण भागात आहे. त्यामुळे ग्राम संस्कृती जाणून घेण्यासाठी आणि महाराष्ट्रातील सण, उत्सव जवळून पाहण्यासाठी एक ब्रिटिश दाम्पत्य महिनाभरासाठी महाराष्ट्रात आले आहे. या ब्रिटिश दाम्पत्याने १३ ऑगस्ट रोजी बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या सप्तऋषींपैकी गोमेधर येथील मंदिर परिसर पाहून कुतूहल व्यक्त केले.
भारतीय संस्कृती व परंपरा सुरूवातीपासूनच इतर देशांना आकर्षित करते. भारतीय सण-उत्सव, संस्कृतीचा मिलाप, ऐतिहासिक वास्तू, हेमाडपंथी मंदिरांचा ठेवा जगाला भुरळ घालणारा आहे. येथील पर्यटन स्थळाचे महत्व विशेष असल्याने इतर देशातूनही पर्यटकांचा ओढा भारतात वाढत आहे. मात्र, केवळ पर्यटनस्थळ पाहण्यासाठीच नव्हे तर भारतीय संस्कृती व येथील सण-उत्सव साजरे करण्याची परंपरा जवळून पाहण्यासाठी इंग्लंड येथील रॅमसे व रती नावाचे एक दाम्पत्य महिनाभरासाठी महाराष्ट्रात आले आहे. महाराष्ट्रात श्रावण महिन्यात सण-उत्सवांची रेलचेल राहत असल्याने ५ ऑगस्टला रॅमसे व रती हे ब्रिटिश दाम्पत्य महाराष्ट्रात आले. अमरावती येथील वैभव मेंडसे हे इंग्लंडला राहत असून, त्यांच्यासोबत ब्रिटिश दाम्पत्य आले आहे. रविवारला हे ब्रिटिश दाम्पत्य बुलडाणा जिल्ह्यात आले होते. त्यांनी जिल्ह्यातील काही पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. त्यामध्ये त्यांनी जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात असलेल्या सप्तऋषींपैकी निसर्गरम्य वातावरण व टेकड्यांच्यामध्ये वसलेल्या गोमेधर येथील गौतमेश्वर संस्थनला भेट देऊन परिसराची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी परिसरातील नागरिकांनी काही शब्द मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. तसेच मंदिर व परिसराची संपुर्ण माहिती जाणून घेतली. महिनाभरासाठी आलेल्या या ब्रिटिश दाम्पत्याला भारतीय संस्कृतीची भूरळ पडली असून, भारतीय संस्कृती ही गावात असल्याने गावसंस्कृतीचा जवळुन अभ्यास रॅमसे व रती हे ब्रिटिश दाम्पत्य करत आहे.
ब्रिटिश पाहुण्यांनी शेतात घेतला रानमेव्याचा आनंद
इंग्लंड येथील रॅमसे व रती नावाचे दाम्पत्य १३ ऑगस्टला जानेफळ येथे आले असता त्यांनी योगेश मिटकरी यांच्या शेत-शिवाराची पाहणी केली. तसेच शेतातील पिकांविषयी माहिती जाणून घेतली. त्यानंतर या ब्रिटिश पाहुण्यांनी शेतातील पेरू, सिताफळ या रानमेव्याचाही आनंद घेतला.
ब्रिटिशकालीन जिल्हा जानेफळचे आजही महत्व
ब्रिटिश काळात बुलडाणा ऐवजी जानेफळ हे जिल्ह्याचे ठिकाण होते. तेव्हा ब्रिटिश परदेशी पाहुण्यांचे जानेफळ परिसरात वास्तव्याला होते. त्यांनी सप्तऋषींची परिक्रमा केली होती. त्यामुळे ब्रिटिशकालीन जिल्हा असलेल्या जानेफळचे इंग्लंडवरून येणार्या पर्यटक पाहुण्यांमध्ये आजही महत्त्व कायम आहे.