ग्रामसेवक प्रशिक्षक केंद्राची इमारत जिल्हा कारागृहाकरीता अधिग्रहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 05:15 PM2020-04-25T17:15:12+5:302020-04-25T17:15:24+5:30
ग्रामसेवक प्रशिक्षक केंद्राची इमारत जिल्हा कारागृहाकरीता तात्पुरते अधिग्रहीत करण्यात आली आहे.
बुलडाणा : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा कारागृहात नवीन बंद्याचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यासाठी येथील ग्रामसेवक प्रशिक्षक केंद्राची इमारत जिल्हा कारागृहाकरीता तात्पुरते अधिग्रहीत करण्यात आली आहे. कोरोनामुळे ग्रामसेवकांच्या प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी आता कैद्यांचे बस्तान राहणार आहे.
बुलडाणा जिल्हा कारागृह अधिक्षक यांच्या पत्रानुसार बुलडाणा कारागृहात दररोज दाखल होणाºया नवीन बंद्याचा प्रवेश कोविड १९ रोगाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी आवश्यक आहे. शहरातील इतर शासकीय अथवा अशासकीय इमारतीस तात्पुरते कारागृह घोषित करणे आवश्यक आहे. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलमान्वये जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी प्रचार्य, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, बुलडाणा यांच्या अधिनस्त असलेले ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, पोलीस मुख्यालयाचे मागे, सिंहगड बिल्डींग, बुलडाणा या इमारतीस तात्पुरते कारागृहासाठी घेण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत ही ग्रामसेवक प्रशिक्षक केंद्राची ही इमारत अधिग्रहीत केली आहे.
या इमारतीस सुरक्षेसाठी २४ तास पोलीस बंदोबस्त जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडून पुरविण्यात येणार आहे. तसेच दैनंदिन कामकाजासाठी एक तुरूंग अधिकारी व एक रक्षक, लिपीक यांची नियुक्ती बुलडाणा जिल्हा कारागृह अधिक्षकांनी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिले आहेत.