चौकशीत दोषी आढळल्याने ग्रामसेवक निलंबित
By admin | Published: July 7, 2017 12:14 AM2017-07-07T00:14:43+5:302017-07-07T00:14:43+5:30
चौकशीत दोषी आढळल्याने ग्रामसेवक डी.एन. भारस्कर यांना निलंबित करण्याची कारवाई गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : तालुक्यातील मोहोतखेड ग्रामपंचायतमध्ये तेरावा व चौदा वित्त आयोग, कर वसुली तसेच एल.ई.डी. लाइटमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी गावातीलच शिवाजी भोपाळे यांनी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे १९ जून २०१७ रोजी केली होती. चौकशीत दोषी आढळल्याने ग्रामसेवक डी.एन. भारस्कर यांना निलंबित करण्याची कारवाई गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांनी केली आहे.
लोणार पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या अनेक ग्रामपंचायतमध्ये विकास कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याच्या मागण्या पंचायत समिती, जिल्हा परिषद कार्यालयाकडे प्रलंबित आहेत. त्यावर कारवाई होताना दिसत नाही; मात्र मोहोतखेड येथील ग्रामस्थ शिवाजी भोपाळे यांनी ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कामांमधील भ्रष्टाचाराची सखोल माहिती घेऊन त्याचा पाठपुरावा केला.
मोहोतखेड ग्रामपंचायतमध्ये तेरावा व चौदा वित्त आयोग, कर वसुली एल.ई.डी. लाइट तसेच निजामपूर येथे तेराव्या वित्त आयोगातून सन २०१४-१५ मध्ये सिमेंट काँक्रिट रस्ता निकृष्ट बनविणे, अशा अनेक संबंधित सरपंच, सचिव व अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी गावातील शिवाजी भोपाळे यांनी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे १९ जून २०१७ रोजी केली होती. मागणीच्या अनुषंगाने केलेल्या चौकशीत ग्रामसेवक डी.एन. भारस्कर दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्याची वेळ गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांच्यावर आली. ग्रामसेवक डी.एन. भारस्कर ऐनकेन कारणामुळे नेहमीच चर्चेत असल्यामुळे अधिकारी त्यांना अगोदरच त्रस्त झालेले होते.
त्यातच त्यांना मुद्दा मिळाल्याने अशी कारवाई केल्याची चर्चा असून, चिरिमिरी घेऊन रस्त्याची लांबी, रुंदी वाढवून देणाऱ्या अभियंता अधिकाऱ्यांना का पाठीशी घातल्या जात आहे, हा कळीचा मुद्दाही ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.