ग्रामसेवक प्रशिक्षणार्थी महिलांची सुरक्षा धोक्यात!
By admin | Published: March 4, 2017 02:17 AM2017-03-04T02:17:43+5:302017-03-04T02:17:43+5:30
बुलडाणा येथील जिल्हा प्रशिक्षण संस्थेतील प्रकार; प्रशिक्षणातून कार्यमुक्त करण्यासाठी निवेदन.
बुलडाणा, दि. ३- येथील जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण केंद्रात महिला कर्मचार्यांची स्वतंत्र निवासी व्यवस्था नसल्याने प्रशिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच महिला कर्मचार्यांना कार्यमुक्त करण्याची नामुष्की प्रसासनावर आली आहे. यशदा अंतर्गत कृषी विभागातील कर्मचार्यांचे येथील जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत २७ फेब्रुवारी ते १0 मार्च २0१७ या काळात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. दरम्यान, २ मार्च रोजी सकाळी एक महिला कर्मचारी आंघोळीला गेली असता प्रशिक्षणार्थी असलेला एक ग्रामसेवक बाथरुममध्ये डोकावून पाहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे महिला कर्मचार्यांनी तातडीने निवेदन देऊन प्रशिक्षणातून कार्यमुक्त करण्याची मागणी केली. येथील जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत नियमितपणे ग्रामसेवक तसेच इतर कर्मचार्यांना प्रशिक्षण दिले जाते. सध्या महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत वर्ग तीनच्या कर्मचार्यांसाठी २७ फेब्रुवारी ते १0 मार्च या काळात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यासाठी कर्मचारी रूजू झाले. एक दिवस प्रशिक्षण व्यवस्थित झाल्यानंतर गुरुवारी सकाळी उपरोक्त प्रकार घडला. यामुळे संतप्त झालेल्या महिला कर्मचार्यांनी तातडीने प्राचार्यांच्या नावे निवेदन देत कार्यमुक्त करण्याची विनंती केली. महिलांचा विषय असल्याने त्यांनीही काहींना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले. मात्र या प्रकारामुळे जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत महिलांच्या सुरक्षा, व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहले आहे.