२५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ग्रामसेविका गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 11:49 AM2020-08-25T11:49:57+5:302020-08-25T11:50:48+5:30
रंगकामाच्या देयकापोटी २५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी दुपारी ताब्यात घेतले.
वरवट बकाल : संग्रामपूर तालुक्यातील सावळी व तामगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका रोहिणी शेळके यांनी रंगकामाच्या देयकापोटी २५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी दुपारी ताब्यात घेतले. तामगाव पोलिसात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केलेल्या रंगकामाचे देयक ४७८० रुपये मिळावे, यासाठी तक्रारकर्त्यांने ग्रामसेविकेकडे मागणी केली. ती रक्कम अदा करण्यासाठी ग्रामसेविका रोहिणी शेळके यांनी तक्रारदारास २५०० रुपये लाच मागितली. तडजोडीअंती २००० रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. तक्रारीवरून १० आॅगस्ट रोजी पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये पंचासमक्ष लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.
संग्रामपुरात सापळा
लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याने पोलिस निरिक्षक श्रीमती जाधव यांच्या पथकाने संग्रामपूरातील शंकर नगर येथे सोमवारी सापळा रचला. यावेळी ग्रामसेविका रोहीणी महादेव शेळके यांनी लाचेची मागणी केली. तसेच लोकसेवक पदाला न शोभणारे वर्तन केले. त्यामुळे आरोपीविरूद्ध लाच लुचपत प्रतीबंधक कायदा संशोधन २०१८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.