निराधारांचे अनुदान बॅंकातच पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:36 AM2021-05-18T04:36:05+5:302021-05-18T04:36:05+5:30
संदीप वानखडे, बुलडाणा : कडक निर्बंधामुळे निराधारांवर आर्थिक संकट येऊ नये यासाठी राज्य शासनाने एप्रिल आणि मे महिन्याचे मानधन ...
संदीप वानखडे, बुलडाणा : कडक निर्बंधामुळे निराधारांवर आर्थिक संकट येऊ नये यासाठी राज्य शासनाने एप्रिल आणि मे महिन्याचे मानधन देण्याची घाेषणा केली हाेती़ महसूल प्रशासनाच्यावतीने निराधारांचे अनुदानही बँकांमध्ये जमा करण्यात आले आहे़ मात्र, कडक निर्बंधामुळे हे अनुदान बँकांतच पडून असल्याचे चित्र आहे़ जिल्ह्यातील २़ १७ लाख लाभार्थ्यांना ३४ काेटी ५६ लाख ३७ हजार ६२४ रुपयांचे वितरण महसूल विभागाच्यावतीने करण्यात आले आहे़
जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराना रुग्णांची संख्या वाढतच असल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत़ जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही बंद करण्यात आली असून बँकाही बंद आहेत़ बँकांना केवळ ऑनलाईन सेवा देण्याची परवानगी देण्यात आली आहे़ कडक निर्बंधाच्या काळात निराधारांना आधार देण्यासाठी राज्य शासनाने एप्रिल आणि मे महिन्याचे अनुदान एकत्र देण्याची घाेषणा केली हाेती़ त्यानुसार जिल्ह्यातील २ लाख १७ हजार ९६० लाभार्थ्यांसाठी ३४ काेटी ५६ लाख ३७ हजार ६२४ रुपयांचा धनादेश बॅंकामध्ये महसूल विभागाच्या वतीने देण्यात आला आहे़ धनादेश देण्याची कारवाई मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आली़ त्यानंतर बँकांना सुट्या हाेत्या तसेच बुलडाणा जिल्हा प्रशासनाच्या वतीने ९ मे राेजी आदेश काढून कडक निर्बंध लागू केले़ २० मेपर्यंत हे निर्बंध राहणार आहेत़ यादरम्यान बँकाही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ त्यामुळे, निराधारांच्या खात्यात अनुदान जमा झाल्यानंतरही त्यांना काढता येत नसल्याचे चित्र आहे़ शासनाने आधार दिला असला तरी कडक निर्बंधामुळे ताे आधारही हिरावल्याचे चित्र बुलडाणा जिल्ह्यात आहे़
एटीएम नसल्याने अडचण
जिल्ह्यातील अनेक निराधार लाभार्थ्यांकडे एटीएम नसल्याने त्यांची अडचण हाेत असली तरी अनेक निराधार निरक्षर असल्याने त्यांना पैसे काढता येत नाही़ त्यामुळे बुलडाणा शहरासह जिल्हाभरातील बँकांमध्ये निराधार गर्दी करतात़ आता बँकांचे व्यवहारच बंद असल्याने पैसे कसे काढावे,असा प्रश्न निराधारांना पडला आहे़
प्रशासनाने सीट देण्याची गरज
कडक निर्बंधातून निराधरांना बँकेतून पैसे काढण्याची सूट देण्याची गरज आहे़ कडक निर्बंधामुळे अनेक निराधारांवर आर्थिक संकट आले आहे़ अनेकांना पैसे जमा झाले किंवा नाही याची माहितीही नाही़ पैसे जमा झाल्यानंतर त्याची माहिती घेण्यासाठी बँकांमध्ये जावे लागते़ सध्या व्यवहारच बंद असल्याने निराधारांवर आर्थिक संकट काेसळले आहे़
जिल्ह्यातील २ लाख १७ हजार ९६० लाभार्थ्यांसाठी ३४ काेटी ५६ लाख ३७ हजार ६२४ रुपये बँकामध्ये जमा करण्यात आले आहेत़ बँका सुरू झाल्यानंतर निराधारांना हे अनुदान मिळणार आहे़ महसूल प्रशासनाच्यावतीने पैसे जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे़
अश्विनी जाधव, तहसीलदार, संजय गांधी निराधार विभाग, बुलडाणा